राज ठाकरेंची सर्वात मोठी घोषणा!! विधानसभेला “इतक्या’ जागा लढवणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची महायुती असा थेट सामना पाहायला मिळेल. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्यानुसार, विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार आहे अशी मोठी घोषणा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केली आहे. राज ठाकरेंच्या या घोषणेमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीसमोर आव्हान उभं राहणार हे नक्की…..

आज वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपच मांडला. राज ठाकरे म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत. विधानसभा निवडणुकीत युती होईल का जागा मिळतील का? असा निर्णय मनात आणून नका. आपण विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार आहोत अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.

आपण सर्व्हे करतोय पक्षातील काही लोकं पाठवून. पहिला सर्व्हे झाला,तुमच्या मतदारसंघात ते लोक येऊन गेलेत. आता पुढे ते लोक येऊन तुम्हाला भेटतील, तुमच्या इथली परिस्थिती त्यांना सांगा. निवडून येण्याची क्षमता असलेले, तयारी असलेल्यांनाच तिकीट देणार आहे. तिकीट मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाही असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1 ऑगस्टपासून राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पावसाचा अंदाज घेऊन हा दौरा असेल. तसेच यावेळी ते पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.