सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये आजपासून 30 ऑगस्ट रोजीपर्यंत फिरत्या लोक अदालतिला प्रारंभ झाला. या फिरत्या लोकअदालतीकरीता निवृत्त न्यायाधिश राजेपांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फिरते लोकअदालत वाहनाचे पूजन निवृत्त न्यायाधिश राजेपांढरे यांच्या हस्ते तर डायसचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश एस. बी. देसाई यांनी दिली आहे.
सातारा येथे पार पडलेल्या कार्यक्रमास सर्व जिल्हा न्यायाधीश, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ न्यायाधीश तसेच वकील संघाचे अध्यक्ष अरुण खोत, जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापक काळे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक जोशी, विधीज्ञ, विधी स्वयंसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फिरते लोकअदालत वाहन कोरेगावकडे रवाना करण्यात आले.
आजपासून सुरु केलेले फिरते लोकअदालतीचे वाहन 9 तालुक्यात फिरणार असून तडजोडी आधारे गावात जावून प्रकरणे निकाली करणार आहेत. यामध्ये आज कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे हे वाहन दाखल झाले आहे. न्याय आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली प्रकरणे फिरते लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने निकाली करावीत, असे आवाहन वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव एस. बी. देसाई यांनी केले आहे.
अशा प्रकारे लोकअदालतीच्या वाहनाचा जिल्हाभर होणार प्रवास –
दि. 11 रोजी खटाव तालुक्यातील गुरसाळे, दि. 14 रोजी माण तालुक्यातील मोगराळे, दि. 17 रोजी खुटबाब, दि. 19 रोजी मौजे फलटण तालुक्यातील जाधववाडी, दि. 21 रोजी खंडाळा तालुक्यातील अंधोरी, दि. 24 रोजी वै तालुक्यातील सुरुर, दि. 26 रोजी जावळी तालुक्यातील सरताळे, दि. 30 रोजी कराड तालुक्यातील मसूर, दि. 10 रोजी कोरेगाव, दि. 12 रोजी खटाव, दि. 13 रोजी वावरहिरे, दि. 18 रोजी विडणी, दि. 20 रोजी खेड, दि. 23 रोजी केंजळ, दि. 25 कुडाळ आणि दि. 27 रोजी उंडाळे या ठिकाणी हे वाहन फिरणार आहे.