हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत तर अमित शहांना (Amit Shah) पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागत आहेत असा खळबळजनक दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे. मोदींनी स्वतः भाजपमध्ये नियम बनवला होता की जो कोणी 75 वर्षांचा होईल तो भाजपमध्ये निवृत्त होईल. त्यामुळे जर देशात भाजपची सत्ता आली तर मोदी आपल्या जागी अमित शाह याना पंतप्रधान करतील असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आज केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेत विविध राजकीय विषयांवर भाष्य केलं.
अरविंद केजरीवाल म्हणाले, मोदीजी येत्या 17 सप्टेंबरला 75 वर्षांचे होणार आहेत. परंतु मोदींनी (Narendra Modi) स्वतः भाजपमध्ये नियम बनवला होता की जो कोणी 75 वर्षांचा होईल तो भाजपमध्ये निवृत्त होईल. त्यामुळे आता जर NDA चे सरकार आलं तर पहिल्या दोन महिन्यांत ते योगीजींची विल्हेवाट लावतील, त्यानंतर नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचे असलेल्या अमित शहांना पंतप्रधान करतील. मोदी स्वत:साठी मते मागत नाहीत तर शहांना पंतप्रधान बनवण्यासाठी मते मागत आहेत. अमित शहा मोदींची गॅरेंटी पूर्ण करणार का? असा सवाल केजरीवाल यांनी केला.
NDA चे सरकार येणार नाहीच
दरम्यान, देशात पुन्हा भाजपप्रणीत NDA चे सरकार येणार नाहीच असा विश्वास सुद्धा केजरीवाल यांनी व्यक्त केला. मला जेल मधून बाहेर येऊन २० तास झाले. मी अनेक लोकांशी बोलत होतो, राजकीय विश्लेषकांशी बोललो … तसेच माझा स्वतःचे असं आकलन आहे कि 4 जून नंतर NDA चे सरकार येणार नाही. उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, बंगाल, झारखंडमध्ये भाजपच्या जागा कमी होत आहेत. सट्टेबाजीच्या बाजारातही त्यांना जास्तीत जास्त 220-230 जागा मिळत आहेत, त्यामुळे भारतात इंडिया आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. भाजपला वाटतं होते कि खोट्या केसमध्ये केजरीवाल ला अडकवायचं आणि तुरुंगात टाकून राजीनामा द्यायला लावायचा … दिल्ली सरकार पाडायच … म्हणूनच मी तुरुंगातूनच सरकार चालवले. मला कोणत्याही पदाचा लोभ नाही, असं केजरीवाल यांनी सांगितलं.