Moeen Ali Retirement : चेन्नईच्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती

Moeen Ali Retirement
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केलेल्या मोईन अलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Moeen Ali Retirement) जाहीर केली आहे. आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी मोईन अलीची इंग्लडच्या संघात निवड झाली नाही, त्यानंतर त्याने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे, जेणेकरून युवा खेळाडूंना संघात जास्तीत जास्त संधी मिळू शकतील असं मोईन अलीने यावेळी म्हंटल.

कारकिर्दीबद्दल अभिमान – Moeen Ali Retirement

डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत मोईन अली म्हणाला, मी 37 वर्षांचा आहे आणि या महिन्यात ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी माझी निवड झाली नाही. मी इंग्लंडसाठी खूप क्रिकेट खेळलो आहे. पण आता पुढच्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे असं मला वाटत. इंग्लंड क्रिकेटने सुद्धा मला हे सांगितलं. स्वतःच्या एकूण कारकिर्दीबाबत मला खूप अभिमान आहे. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा इंग्लंडकडून खेळता तेव्हा तुम्ही किती सामने खेळणार आहात हे तुम्हाला माहीत नसते. परंतु आजअखेर मी इंग्लंड कडून जवळपास 300 सामने खेळू शकलो या गोष्टीचा मला निश्चितच अभिमान आहे. सुरुवातीला मी फक्त कसोटी संघात होतो, मात्र इयॉन मॉर्गनने एकदा एकदिवसीय क्रिकेटमध्ये मला संधी दिल्यानंतर क्रिकेट खेळताना आणखी मजा आली असेही मोईन अलीने म्हंटल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून जरी निवृत्ती घेतली (Moeen Ali Retirement) असली तरी मी फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहीन कारण मला अजूनही क्रिकेट खेळायला आवडते. तसेच कोचिंग ही एक गोष्ट आहे जी मला करायला आवडेल अशी भावना मोईन अलीने व्यक्त केली.

मोईन अलीने २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केलं. त्याने आत्तापर्यंत इंग्लंड कडून 68 कसोटी, 138 एकदिवसीय आणि 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने तिन्ही फॉरमॅट मिळून इंग्लंडसाठी ६६७८ धावा केल्या. यामध्ये आठ शतके आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने 366 विकेट्स घेतल्या. मधल्या फळीत डाव्या हाताने आक्रमक फलंदाजी आणि ऑफ स्पिन गोलंदाजीची जबाबदारी या काळात मोईन अलीने सांभाळली. मोईनच्या फिरकीमुळे इंग्लडच्या संघाला अतिरिक्त जलदगती गोलंदाज संघात घेणं सोप्प होत असे.