Mohammad Nabi । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली. यामध्ये अफगाणिस्तानचा स्टार दिग्गज अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबी एकदिवसीय क्रिकेट मध्ये नंबर १ ऑल राऊंडर ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ३९ व्या वर्षी नबीने हा कारनामा केला आहे. बांगलादेशच्या शाकिब अल हसनला मागे टाकत नबीने पहिले स्थान पटकावलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटची मान उंचावली आहे.
मोहम्मद नबी ३१४ गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर शाकिब अल हसन ३१० गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात नबीने (Mohammad Nabi) 136 धावांची शानदार खेळी केली आणि 1 बळीही घेतला. त्याचा त्याला फायदा झाला आणि त्याने शाकिबला धोबीपछाड देत वन डे मधील जगातील नंबर १ अष्टपैलू खेळाडू ठरला. परंतु टी-20 अष्टपैलूंच्या क्रमवारीत 256 गुणांसह शाकिब अजूनही अव्वल स्थानी कायम आहे.
कशी आहे नबीची कारकीर्द – Mohammad Nabi
दरम्यान, मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तान क्रिकेटचा दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अफगाणिस्तानचा संघ नवखा असल्यापासून तो संघात आहे. काही काळ त्याने अफगाणिस्तानचे नेतृत्व सुद्धा केलं आहे. खालच्या क्रमाकांवर येऊन आक्रमक फलंदाजी करणे आणि ऑफ स्पिन गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजाना बाद करण्यात नवी माहीर आहे. तसेच इतका मोठा प्रदीर्घ क्रिकेटचा अनुभव असल्याने तो अनुभव सुद्धा नबीच्या कामी येतो. नबीने अफगाणिस्तानसाठी आतापर्यंत १५८ वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 139 डावांमध्ये 26.97 च्या सरासरीने 3,345 धावा कुठल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत नबीच्या नावावर 2 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. तर गोलंदाजीत त्याने 158 सामन्यात 32.58 च्या सरासरीने 163 विकेट घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/३० अशी राहिली आहे.