हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईवरील 26/11 च्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या तहव्वूर हुसैन राणाला आता भारतात आणले आहे. तसेच त्याला चौकशीसाठी 18 दिवसांची एनआयए (NIA) कोठडी सुनावण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला फाशी द्या अशा मागण्या होताना दिसत आहेत. 2008 मध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या ‘छोटू चहावाला’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मोहम्मद तौफिक यांनी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, राणाला कसाबप्रमाणे कोणतीही विशेष वागणूक देऊ नये. “त्याला बिर्याणी, वेगळी कोठडी किंवा कोणतीही सुविधा देऊ नका, त्याला फाशी द्या,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
मोहम्मद तौफिक कोण आहे –
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) जवळ चहाचा व्यवसाय करणारे मोहम्मद तौफिक यांनी त्या रात्री सीएसएमटीमध्ये झालेल्या हल्ल्याचा थरार अनुभवला होता. गोळीबार सुरू असताना अनेक प्रवाशांना त्यांनी सतर्क केले, अन सुरक्षित स्थळी जाण्यास मार्गदर्शन केले . तसेच जखमींना रुग्णालयात पोहोचवले. आता तौफिक यांनी अमेरिकन सरकार अन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत . कारण त्यांनी राणाचे प्रत्यार्पण भारतात केले. ते म्हणाले, “भारतानेही आता दहशतवाद्यांविरोधात अधिक कठोर कायदे करावेत अन अशा गुन्हेगारांना झटपट शिक्षा द्यावी. राणाला दोन-तीन महिन्यांत फाशी देण्यात यावी, त्याच्यावर कसाबप्रमाणे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात काही अर्थ नाही.”
चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे –
केंद्रीय गृह मंत्रालयाचे माजी सचिव गोपालकृष्ण पिल्लई यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, राणा हा डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा सहकारी आहे. मुंबईत आपल्या इमिग्रेशन फर्मद्वारे त्याने हेडलीला भारतात येण्यासाठी सोय केली होती. त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. “राणाला दोषी ठरवले जाईल अन फाशीची शिक्षा सुनावली जाऊ शकते,” असेही पिल्लई म्हणाले.