औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अस असताना धंद्यांना मात्र तेजी आली असल्यामुळे दारू, तसेच तंबाखू जन्य पदार्थाना मोठी मागणी आहे. फुलंब्री तालुक्यात या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. यावर कारवाई करत तालुक्यातील पाल येथे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 11 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा तसेच एकूण 22 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी पाल येथे लाखो रुपयांचा गुटखा येणार असल्याची माहिती विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विवेक जाधव यांना खबऱ्या मार्फत मिळाली. त्यावरून त्यांनी सापळा रचून पाल येथे टाटा 407 कंपनीचे वाहन पकडले व त्यात काय आहे असे विचारले. तेव्हा चालक इम्रान इंद्रिस शेख याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने यामध्ये राजू पंडित मोरे व संतोष तेजराव जाधव यांचा हा गुटक्याचा माल असल्याची माहिती दिली.
यावेळी पाहणी केली असता यामध्ये 58 गोण्या गोवा पर्पल गुटख्याच्या व 4 गोण्या गायछापच्या आढळून आल्या असून याची किंमत 11 लाख 60 हजार रुपये तर टाटा 407 हे वाहन मिळून एकूण 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी वाहनासाहित सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”