Monsoon Tourism : पावसाळ्यात गोवा ठरतोय पर्यटकांचा केंद्रबिंदू; ‘या’ ठिकाणांना भेट देऊन घ्या मनसोक्त आनंद

Monsoon Tourism Goa
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वांत छोटे राज्य असले तरीही पर्यटन स्थळांच्या (Monsoon Tourism) यादीत अव्वल ठरलेले राज्य म्हणजे गोवा. गोवा हे नाव घेताच मनात एक सुंदर चित्र उभे राहते ते म्हणजे निळाशार समुद्रकिनारा आणि हिरव्यागार माडां पोफळींचे पांघरूण ओढलेला गोवा. गोव्यात आलेला प्रत्येक माणूस याच्या सौंदर्याने सुखावतो आणि आपल्या कष्टी जीवनातून वेळ काढून ताजातवाना होतो. भगवान परशुरामाचा आशीर्वाद लाभलेली ही गोमंतकाची भूमी पावसाळी सहलींसाठी आजकाल केंद्रबिंदू ठरत आहे. पण गोव्यातील समुद्र किनारे, नाईट लाईफ आणि चर्चेस वगळता आपल्याला गोव्यातील इतर नयनरम्य स्थळांची फारशी माहिती नसते. पावसाची सर दारात आली की आपसूकच आपली पावलं ही भटकंतीसाठी निघतात,‌ बाहेर पडायचे म्हटले की नेमके ठिकाण निश्चित करणे हे मात्र फार कठीण होऊन जाते. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या शेजारी वसलेला गोवा हे निसर्गाचे वरदानच आहे. आज आपण गोव्यातील अशाच कैच पर्यटन स्थळांबद्दल जाणून घेणार आहोत ज्याठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.

Chorla Ghat
Chorla Ghat

1) चोरला घाट (Chorla Ghat) – (Monsoon Tourism)

पावसाळ्याच्या वेळी शांतता अनुभवायची असल्यास गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा चोरला घाट याला विसरता येणार नाही. गोव्याची प्रमुख आकर्षण स्थळे वगळता या भागांबद्दल पर्यटकांना फारशी माहिती असत नाही त्यामुळे अशा जागा या मुळातच शांत असतात व निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आपल्याला मदत होते. उत्तर गोव्यात साखळी या शहरापासून काही किलोमीटर अंतर पार करून आपण चोरला घाटात पोहोचतो. आजूबाजूला असलेली दाट झाडी, अधून मधून होणारा पक्षांचा किलबिलाट, आणि डोंगराच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून वाहणारे पावसाचे पाणी ही घाटाची विशेषता आहे. रस्त्याच्या एका कोपऱ्यावर उभे राहून आपण सृष्टीची विविधरंगी जादू अनुभवू शकतो.

sattari
sattari

2) सत्तरी () –

गोव्यातील सत्तरी तालुका हा त्यातील ७० गावांसाठी ओळखला जातो. या ७० गावांमध्ये, अनेक पर्यटकांची (Monsoon Tourism) पावले पावसाची मजा घेण्यासाठी वळताना दिसतात. गोव्यातील इतर भागांच्या तुलनेत, सत्तरीचा हा भाग अजूनही निसर्गाला जपताना दिसतो. फारसे तांत्रिक बदल न झालेला हा भाग शहरीकरणाला नाही तर वनक्षेत्राला जपण्याकडे प्राधान्य देतो. येथील अनेक दुर्लक्षित गावांमध्ये असलेले धबधबे पर्यटकांसाठी मनोरंजनाचे तर ग्रामस्थांसाठी रोजगाराचे साधन ठरतात. गावागावांमधून वाहणाऱ्या या धबधब्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय देखील आहे. केवळ भारताच्या अनेक भागांतूनच नाही तर विश्वाच्या अनेक कोपऱ्यांतून निसर्ग अनुभवण्यासाठी लोकांची पावले या ठिकाणी येताना दिसतात. गोवा अनुभवण्यासाठी आलेली मनं निसर्ग सौंदर्य सृष्टी बरोबरच येथे लोकांच्या आदरातिथ्याने कृतकृत्य होतात.

Sri Chandrashwar Bhootnath Temple
Sri Chandrashwar Bhootnath Temple

3) श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थान (Sri Chandrashwar Bhootnath Temple)-

पावसाच्या दिवसांत प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण म्हणजे दक्षिण गोव्यातील श्री चंद्रेश्वर भूतनाथ देवस्थान. गोव्यातील अनेक पुरातन देवस्थानांपैकी चंद्रेश्वर भूतनाथ या संस्थानाला एक मानाचे स्थान प्राप्त आहे. डोंगरावर वसलेल्या ह्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी थोडेसे ट्रेकिंग करत जाण्याचे गरज असते, पावसाच्या दिवसांत थोडासा निसरडा झालेला रस्ता हा सोबत असलेल्या नैसर्गिक सौंदर्यामुळे फारसा कठीण किंवा भीतीदायक वाटत नाही. शंकराचे दर्शन घेतल्यानंतर पर्यटकांना जवळच असलेल्या काबोदे रामाचा किल्ला किंवा गालजिबागच्या समुद्राला भेट देण्याची संधी प्राप्त होते.

Netravali
Netravali

4) नेत्रावळी (Netravali) –

दक्षिण गोव्याच्या दिशेने जाता कोणीही डावलू नये असा भाग म्हणजे नेत्रावळी. नेत्रावळीचे बुडबुडतळी ही तर सुप्रसिद्ध आहेच, पण याच सोबत जवळून पाहता येणारा निसर्ग,थंड हवेचा साळजिणी गाव अशा अनेक पर्यटन स्थळांमुळे (Monsoon Tourism) नेत्रावळीला बारमाही पर्यटक येत असतात. टाळीचा आवाजाने, किंवा मुखातून केलेल्या उच्चाराने तळ्यातील पाण्याला आपोआप बुडबुडे येताना दिसतात. निसर्गाचे ही अशी अप्रतिम जादू केवळ पावसातच नाही तर इतर वेळी देखील अनुभवता येते. सत्तरी प्रमाणेच आधुनिक जगापासून किंचित दूर असलेला हा भाग पावसाळी दिवसांत अजून जास्त खुलून दिसतो.

Dudhsagar Waterfall
Dudhsagar Waterfall

5) दूधसागर धबधबा (Dudhsagar Waterfall) –

गोवा व कर्नाटकाच्या सीमेवर घनदाट जंगलात असलेला प्रसिद्ध दूधसागर धबधबा आपल्या परिचयाचा आहे. दरवर्षी पावसाला सुरवात होताच कानाकोपऱ्यांतील पर्यटकांना तो खुणावत असतो. उंच शिखरावरुन कोसळणार्‍या या धबधब्याचे मनोहारी रुप पाहण्याजोगे आहे. जवळून सुसाट वेगाने धावणारी रेल्वेगाडी प्रवाशांना हा सुखकर अनुभव करवून देते. यंदाच्या वर्षी पावसाळ्याचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या गोव्याला नक्की भेट द्या.