मुंबई । राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीय. येत्या 15 जानेवारीला येथे मतदान होणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये चांगल्या आणि आकर्षक अशा निवडणूक चिन्हावर प्रत्येक उमेदवाराचा डोळा आहे. चांगले आणि सर्वपरिचित निवडणूक चिन्ह मिळाले, तर मतदारांना मतदान करण्यास सोपे होईल, असा या मागचा उमेदवारांचा उद्देश आहे. 4 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवारांनी चिन्ह वाटपात कपबशीची मागणी केली आहे. त्यासोबत छताचा पंख्यालासुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
एकाच गावातील उमेदवारांनी कपबशी चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी समोर ही प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कपबशी चिन्हावर अनेक उमेदवारांना निवडून देताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदानासाठी तब्बल 190 निवडणूक चिन्हांची यादी जारी केलीय. यामध्ये प्रथमच संगणकाचा माऊस, पेनड्राईव्ह आणि मोबाईल चार्जरचा समावेश केला आहे. निवडणुकीत हमखास विजय मिळावा, या हेतूने दैनंदिन वापराशी निगडित आणि आकर्षक चिन्हांवर उमेदवारांचा डोळा आहे. 4 जानेवारीला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानंतर याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
दरम्यान, निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांकडून चांगलीच तयारी सुरु आहे. निवडणूक चिन्ह घेण्यापासून ते मतदारांनी मतदान करण्यापर्यंत सर्व रणनीती आखली जात आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत केवळ 48 चिन्हांचा समावेश होता. इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडे निवडणूक नियमावली आणि अटींबाबत चर्चा करीत आहेत. (Demand For Cupbashi Sigh for Gram Panchayat Election)
असा आहे निवडणूक कार्यक्रम जाहीर
14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय. कोरोनाच्या काळात एप्रिल ते डिसेंबरमध्ये या ग्रामपंचायतींची मुदत संपलेली होती. त्यामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. आता या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’