कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्यात अधिकाधिक ICU बेड्स उपलब्ध – मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई ।  ”गेल्या सुमारे तीन महिन्यांपासून राज्य शासन कोरोनाशी मुकाबला करत असून विविध उपाययोजना करत या कोरोना साथीला अद्यापपर्यंत नियंत्रणात ठेवले आहे. चाचण्यांचा वेग सुद्धा लक्षणीयरित्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या देखील वाढत आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि पुणे येथील आझम कॅम्पसमधील मस्जिदमध्ये कोरोना विरुद्ध लढण्याची तयारी करण्यात येत आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत दिली आहे.

नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालये आणि संस्था यांना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती केली आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाचा सामना करण्यासाठी चीनच्या वुहान शहारात उभारण्यात आलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या धर्तीवर राज्य सरकारवतीने मुंबई येथील बीकेसी संकुलात युद्धपातळीवर उभारण्यात येणाऱ्या १ हजार खाटांची क्षमता असलेल्या कोविड-१९ रुग्णालयाच्या कामाची काल मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे भेट देऊन पाहाणी केली.

दरम्यान, पुण्यात विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे ४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. विप्रो लिमिटेड कंपनीच्या मदतीमुळे वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती ठाकरे यांनी दिली. हे विशेष कोविड रुग्णालय हिंजवडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment