एसटीच्या चाकांना गती ! जिल्ह्याभरात सव्वाशेहून अधिक बस रस्त्यावर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात विविध मार्गावर 129 बस सोडण्यात आल्या होत्या. या बसने 378 फेऱ्या केल्या असून साडेपाच हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी दिवसभरात प्रवास केला. यात पुणे मार्गावर 14 तर नाशिक मार्गावर 7 बसने 14 फेऱ्या केल्या. तसेच शुक्रवारी दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या आता 38 झाली आहे.

एसटी प्रशासनाने सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती पत्करलेल्या माजी चालकांची करार पद्धतीने नेमणूक करण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत 20 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. काही प्रमाणात सेवेत हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने एसटीने शुक्रवारी सिडको बस स्थानकातून 25 लालपरी 2 हिरकणी अशा 27 बस सोडल्या होत्या. त्या बसेसनी 72 फेर्‍या केल्या. मध्यवर्ती बस स्थानकातून 21 शिवशाही बस ने नाशिक व पुणे मार्गावर 28 फेऱ्या केल्या. तर एकूण 40 बसने पुणे, नाशिक, कन्नड, सिल्लोड, बुलढाणा, अहमदनगर, वैजापूर, मार्गावर 82 पुऱ्या केल्या आहेत. पैठण डेपोने औरंगाबाद, जालना, शहागड, पुणे, शेवगाव, अंबड मार्गावर 15 लालपरी चालवत 40 फेऱ्या केल्या. सिल्लोड डेपोतूनही औरंगाबाद, जालना, कन्नड मार्गावर 5 लालपरी चालवत 20 फेऱ्या केल्या आहेत.

वैजापूर डेपोतून औरंगाबाद, कोपरगाव, गंगापूर आणि नाशिक मार्गावर 5 बस सोडण्यात आल्या. कन्नड डेपोतून औरंगाबाद, वडनेर, पिशोर, सिल्लोड, चिंचोली, भारंबा, वैजापूर, फुलंब्री, गंगापूर, जेऊर या मार्गावर एकूण चोवीस बस चालवत 76 फेऱ्या केल्या. गंगापुर डेपोने औरंगाबाद, कन्नड आणि वैजापूर मार्गे सात बस चालवण्यात आल्या. तर सोयगाव डेपोने 2 शिवशाही, 6 हिरकणी अशा 8 बस चालवण्यात आल्या. दिवसभरात 129 बसच्या 378 फेऱ्या करत जिल्ह्याभरात 5 हजार 507 प्रवाशांची वाहतूक करण्यात आली.

Leave a Comment