हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार आणि नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील होऊ लागलेत. ठाणे आणि नवी मुंबई नंतर आता कल्याण डोंबिवली महापालिकेतील ४० हुन अधिक नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटाला आपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेत खिंडार पडलं आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेतील शिवसेनेचे संख्याबळ ५९ आहे. यापैकी ४० हून अधिक नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे ठाणे आणि नवी मुंबई नंतर आता कल्याण-डोंबिवलीमधूनही उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
यापूर्वी ठाणे महागनरपालिकेतील ६६ शिंदे गटात सहभागी झालेत. ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे एकहाती वर्चस्व असून तेच ठाण्यातील शिवसेना सांभाळत होते . तर नवी मुंबई महापालिकेत देखील सेनेला मोठं भगदाड पडलं असून तब्बल ३२ नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे यांच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून शिवसेनेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं बंड ठरलं आहे