देशात दिवसभरात 1 लाख 17 हजार कोरोनाबाधित; ओमायक्रोन रुग्णसंख्या 3 हजारांवर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनारुग्णसंख्येचा विस्फोट झाला असून काल दिवसभरात तब्बल 1 लाख 17 हजार रुग्ण हे कोरोना बाधित आढळले आहेत. देशात जवळपास सात महिन्यानंतर पुन्हा एकदा २४ तासात नव्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

देशात काल एका दिवसात १ लाख १७ हजार १०० इतके नवे रुग्ण आढळले. तर दिवसभरात ३० हजार ८३६ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात ३०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशातील दैनंदिन पॉझिटिव्ही रेट ७.७४ टक्के इतका झाला आहे.

भारतातील ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रोन बाधितांची संख्या ३ हजारांच्या वर पोहोचली आहे. राज्यातील २७ राज्यात ओमिक्रॉन पोहोचला आहे. एकूण ओमिक्रॉन बाधितांपैकी ११९९ जण बरे होऊन घरी परतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.