हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना बोर्डाचा पेपर (Board Exam) लिहिण्यासाठी दहा मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे. राज्य मंडळांने घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेवेळी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत होती. परंतु मधल्या काळात परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरस झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या. या सर्व गोष्टींना आळा बसण्यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी 10 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्याची करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 सालापासून बंद करण्यात आली होती. आता सरकारने आणखीन एक पाऊल उचलत विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन फेब्रुवारी-मार्च 2024 च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
सुधारित वेळ कशी असेल?
थोडक्यात सांगायचे झाले तर बोर्डाचा पेपर हा तीन तासाचा असेल तर, त्याची वेळ 10 मिनिटे वाढवून 3.10 अशी असेल. म्हणजेच, विद्यार्थ्यांना पेपरचा वेळ संपल्यानंतर निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे अधिक वाढवून देण्यात येतील. या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या, शांत डोक्याने पेपर लिहिता येईल. तसेच वेळ जास्त मिळाल्यामुळे पेपर मध्ये कोणतीही घाई गडबड होणार नाही.