टीम हॅलो महाराष्ट्र । सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे. याचा पुरावाच नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम ब्युरो रेकोर्ड्सच्या अहवालाने दिला आहे. या अहवालानुसार देशात सन २०१८ मध्ये देशभरात १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालातून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.
या अहवालाच्या आकडेवारीनुसार सन २०१६मध्ये ११ हजार ३७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. २०१८ मध्ये या संख्येत घट झाली हाच थोडाफार दिलासा म्हणावा लागेल. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. देशात झालेल्या एकूण शेतकरी-शेतमजुर आत्महत्येपैकी राज्यात ३४.७ टक्के आत्महत्या झाल्या आहेत. कर्नाटक (२३.२ टक्के) तेलंगण (८.८ टक्के), आंध्र प्रदेश (६.४ टक्के) आणि मध्य प्रदेश (६.३ टक्के) अशी क्रमवारी आहे.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, वर्ष २०१८ मध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता.