वृद्ध बहिणीला भेटून घरी परतताना मायलेकीवर काळाचा घाला

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुंबईतील वृध्द बहिणीला भेटून गावाकडे परतत असताना मायलेकीवर काळाने घातला आहे. हॉटेलमध्ये जेवण करुन बाहेर थांबल्या असताना या दोघींना ट्रकने चिरडले आहे. या अपघातात या दोघी मायलेकींचा जागीच मृत्यू झाला आहे. शांताबाई विठ्ठल चवरे, जयश्री चंद्रकात वरपे अशी अपघातात ठार झालेल्या मायलेकींची नावे आहेत. या दोघीही कोंडी गावातील रहिवासी होत्या.

टेंभुर्णी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांताबाई चवरे आणि जयश्री वरपे या दोघी मायलेकी मुंबईत बहिणीला भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथून त्या 23 मार्च रोजी रात्री सोलापूरमध्ये परतल्या. यानंतर या दोघींनी सोलापूरमध्ये उतरल्यानंतर हॉटेलमध्ये जेवण केले. जेवून झाल्यानंतर त्या घरी परतत होत्या.

यानंतर हॉटेलमधून निघाल्यानंतर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर माढा तालुक्यातील टेभुर्णी बाह्यवळण रस्त्यावर उभ्या असतानाच रात्री साडे दहाच्या सुमारास ट्रकने या दोन्ही मायलेकींना चिरडले. या अपघातात एका मोटार सायकलसह चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र हा अपघात कसा घडला हे अजून समजू शकलेले नाही. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून संदीपान नवनाथ जगताप या आरोपी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.