15 वर्षांच्या मुलीच्या पर्समध्ये आईला सापडल्या गर्भनिरोधक गोळ्या, प्रेग्नन्सी किट; नंतर…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बजाजनगर परिसरातील आईने सहजच आपल्या १५ वर्षीय मुलीची पर्स तपासली व त्यात गर्भनिरोधक औषधी व प्रेग्नसी किट पाहून तिला धक्काच बसला. विश्वासात घेत मुलीला बोलते केले तेव्हा तिच्यावर कधी प्रेमाआडून, तर कधी दहशतीने मागील दोन महिन्यापासून सतत शारीरिक आघात केले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली. आईने मुलीला सोबत घेत पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी अरविंद सदावर्ते यास गावाहून अटक करून आणले. न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

पीडिता ही आई व सावत्र वडिलांसोबत बजाजनगरात राहते. ती बजाजनगर परिसरात शिवण क्लासचे प्रशिक्षण घेते. दोन महिन्यापूर्वी रेश्मा शिवण क्लासला जात असताना रस्त्यात तिची मोपेड बंद पडली. रस्त्याने जाणाऱ्या अरविंद सदावर्तेकडे तिने मदत मागितली. त्याने प्रयत्न करूनही मोपेड दुरुस्त होत नसल्याने अरविंदने तिच्याकडून आईचा मोबाइल नंबर घेतला व त्यांना मोपेड बंद पडल्याची माहिती दिली.

पीडितेचा मोबाइलनंबर अरविंदकडे आल्याने त्याने सतत तिच्याशी गप्पा मारून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. १५ दिवसांपूर्वी आईने तिची पर्स तपासली असता त्यात गर्भनिरोधक गोळ्या व प्रेगन्सी किट आढळले. आईने तिची विचारपूस केली असता अरविंदशी प्रेमसंबंध व शारीरिक संबंध आल्याचे तिने सांगितले.

प्रेमाच्या जाळ्यात ओढल्यानंतर अरविंदने तिला लग्नाचे आमिष दाखवून त्याच्या घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रसंगाचे अरविंदने गुपचूप मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले. तिला व्हिडिओ क्लिप दाखवून अरविंद तिला रूमवर नेऊन अत्याचार करू लागला. तिने नकार दिला तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आपले ईप्सित साध्य करू लागला होता.

प्रकार उघडकीस आल्यावर आई-वडील व मित्रमंडळीनी अरविंदच्या घरी जाऊन त्याचा मोबाइल ताब्यात घेतला. या मोबाइलमध्ये ती अश्लील क्लिप सापडली. अरविंदने गयावया करून तो लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर तो गावी गेला होता. आई-वडिलांना आणण्यासाठी गावी गेलेला अरविंद परत येत नसल्याने तिच्या आईने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

आरोपी अरविंद सदावर्तेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे हे तपास करीत आहेत.

Leave a Comment