सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मुलीस जाळून मारल्याच्या संशयावरून जावई सुनील बाबुराव इंगळे याचा खून केल्याप्रकरणी सासू लिलाबाई अशोक साठे व मेहुणा श्रीकांत अशोक साठे यांना पहिले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम.चंदगडे यांनी अजन्म करावासाची शिक्षा ठोठावली. मयत सुनील बाबुराव इंगळे याने आरोपी लिलाबाई साठे हिच्या मुलीशी 21 जुलै 2010 साली आंतरजातीय विवाह केला होता. त्यानंतर इंगळे याची पत्नी सुवर्णा ही पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाली. ती नोकरीत असताना वाटेगाव येथे 6 फेब्रुवारी 2015 रोजी स्टोव्ह पेटवित असताना त्याचा भडका होवून भाजून गंभीर जखमी झाली. तीला उपचारासाठी कराड येथे दाखल केले.
14 फेब्रुवारी 2015 रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सुवर्णा हीला पतीनेच जाळून मारले असेल असा साठे व नातेवाईकांचा संशय होता. दरम्यान 17 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 9 वाजता वाटेगाव ते भाटवाडी रोडवर श्री मायाक्का मंदिराशेजारी श्रीकांत साठे व लिलाबाई साठे यांनी सुनील इंगळेस दगड व विटांनी मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सुनील इंगळे याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात श्रीकांत साठे व लिलाबाई साठे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या केसची सुनावणी एस.एम.चंदगडे यांच्या कोर्टात सुरू होती. या केसमध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पंच, प्रत्यक्ष दर्शनी साक्षीदार, मेडिकल ऑफिसर व तपासी अंमलदार विक्रांत हिंगे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. पूर्वनियोजित कट करुन स्वतःच्या जावायाचा निर्घृणपणे स्वतःच्या फायद्यासाठी निर्घृण खून करण्यात आला आहे. असा युक्तीवाद जिल्हा सरकारी वकील शुभांगी पाटील यांनी केला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी आरोपींना अजन्म कारावासाची शिक्षा सुनावली.