हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सख्खी आईच आपल्या मुलाच्या जीवावर उठल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या पोटच्या गोळ्याला आईनेच प्रियकराच्या मदतीने ठार केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अंबड पोलिसांनी महिलेच्या प्रियकराला आणि अजून एका आरोपीला अटक केली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील डावरगाव येथे राहणाऱ्या शीतल उघडे आणि नवनाथ जगधने यांच्यात विवाहबाह्य प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधात शीतलचा सहा वर्षांचा मुलगा अडसर ठरत होता. त्यामुळे तिने स्वतःच्या मुलाला प्रियकराच्या हवाली केले. प्रियकर नवनाथ जगधने आणि त्याच्या मित्राने अंबड-घनसावंगी रोडवर नेले. रस्त्याच्या बाजूला नेऊन त्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर निर्दयीपणे या चिमुकल्याचा जीव घेतला.
यानंतर मुलगा हरवल्याचा बहाणा करत महिलेने अंबड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली. पोलिसांना यावेळी महिलेवरच संशय आला. तपासादरम्यान पैठण येथील नवनाथ जगधने याने मुलाचा खून केल्याची माहिती मिळाली. पैठण येथून नवनाथ जगधने याला ताब्यात घेतले असता त्याने माझे व मयत मुलाच्या आईचे प्रेमसंबध असल्याची कबुली दिली.