मावस भावानेच केला अल्पवयीन बहिणीवर अत्याचार

औरंगाबाद – अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच वारंवार अत्याचार करून गर्भवती केले. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नराधम भावाला बेड्या ठोकल्या आहेत.

याविषयी अधिक माहिती अशी की, गोलवाडी येथील 17 वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्याच मावस भावाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. तिला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी 29 डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता ही सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला. पीडितेची सात महिन्याची गरोदर असताना घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मावस भावानेच अत्याचार केल्याचे समोर आले.

या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी डी. एन.ए.नमुना घेतला असून तो तपासणी साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.