आईपण !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आई! या शब्दातच केवढी अफाट शक्ती आहे. त्याग, वात्सल्य, ओढ, प्रेम, आपुलकी सारं काही या एकाच व्यक्तीच्या ठायी. पण मला प्रश्न पडायचा, हे आईपण येतं कधी, जाणवतं कधी? उमलत्या वयात गर्भाशयाची वाढ होत असताना बाईपणाचं वाण आणि आईपणाचं बीज आपल्या पदरात पडतं, की आपण खरंच आई होणार असल्याची चाहूल लागते तेंव्हा, की पहिल्यांदा तो इवलासा जीव आपण छातीशी कवटाळतो तेंव्हा? मला आई होण्याची चाहूल लागली तेंव्हा आईपणापेक्षा दडपण आणि जाबदारीच जास्त वाटत होती. निसर्ग नियमानुसार नऊ महिने सरता माझा मुलगा जन्माला आला. त्याला पहिल्यांदा जवळ घेतल्यानंतर वाटलं काय ही निसर्गाची किमया! नवल आणि नितांत काळजी वाटली. हा जीव संपूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे याची नव्याने आणि अधिक तीव्रतेने जाणीव झाली. खरा प्रवास तर तिथून सुरू झाला.

पुस्तकांमधून मी अनेकदा वाचलंय, गरोदर असतानाच तिला आईपणाचा पाझर फुटला वगैरे वगैरे. इथे तर माझं पोटच पोर, नऊ महिने माझ्या पोटात वाढलेल जन्माला आलं होतं. त्याच्या स्पर्शाने आंतरिक आनंद मिळाला होता खरा. पण ही भावना काही गवसत नव्हती. हळूहळू आमच्या सहवासागणिक आमचं नातं आणखी दृढ झालं. हजार लोकांच्या गर्दीत जेंव्हा त्याचे डोळे मला शोधत होते, अनोळख्याने घेतल्यावर डोळे पाणावत होते, मी दिसताच त्याच्या ओठांमध्ये हसू उमटत होतं , छातीशी कवटाळून मी त्याला अंगाई म्हणत होते तेंव्हा मला गवसलं ‘ते’ आईपण.

वाटतं आईपण सहवासात आहे, स्पर्शात आहे, विश्वासात आहे, कुशीतल्या विसाव्यात आहे, जबाबदारीत आहे. हे आईपण मला जाणवलं तेंव्हा मेंदूत आणि अंतर्मनात साक्षात्कारच शूळ उठलं. जगण्याची नवी उमेद, प्रेरणा मिळाली. प्रसंगांगणिक, संवादागणिक, सहवासागणिक, स्पर्शागणिक ही भावना अधिक खोल आणि परिपक्व होत चालली आहे.
फक्त या आईपणाचं ओझं आणि अडचण मला आणि माझ्या मुलांना वाटू नये एवढी काळजी मात्र मी घेते आहे. कारण काहीही असलं तरी शेवटी आपण आणि आपली मुलं स्वतंत्र व्यक्तिमत्व असलेल्या स्वतंत्र व्यक्तीच आहोत….

सौ. ईरा क्षितिज बेलापुरे
फोन – 7588575621

Leave a Comment