Sunday, May 28, 2023

धक्कादायक ! मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरूणीने प्रियकराला सेल्फी पाठवुन केली आत्महत्या

रिवा : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमधील रिवा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरूणीने आपल्या प्रियकराला शेवटचा सेल्फी पाठवला आणि त्यानंतर तिने जळवळच्याच एका कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या २२ वर्षीय तरुणीचे नाव नेहा पटेल असून ती राणी तलावाकडे मॉर्निंग वॉकसाठी निघाली होती. मात्र बुधवारी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला.

या तरुणीने आत्महत्येआधी प्रियकर दिलीप तिवारी याला व्हॉट्सअ‍ॅपवर सेल्फी पाठवला होता. तो सेल्फी तिने कालव्याजवळच काढला होता. त्यामुळे प्रियकराला याचा संशय आला व त्याने लगेच याची माहिती त्या तरुणीच्या कुटुंबियांना दिली. यानंतर तरुणीच्या हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी सिलपरा कालव्यात रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. बरीच शोधाशोध केल्यानंतर तरूणीचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. मृत तरूणी आणि दिलीप तिवारी दोघेही एका सोनोग्राफी सेंटरमध्ये सोबत काम करत होते.

काही दिवसांपूर्वीच दिलीपला सेंटरमधून काढून टाकण्यात आले होते अशी माहिती पोलीस अधिकारी जगदीश ठाकूर यांनी दिली आहे. पोलीस प्रियकर आणि तरुणीच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. या तरुणीच्या कुटुंबीयांकडून दिलीप तिवारीवर मुलीला आत्महत्येसाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.