औरंगाबाद । राज्यातील बिअर बार उघडे ठेवून धार्मिक स्थळे बंद ठेवणारे आघाडी सरकार दारुड्यासारखे वागत असल्याची टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. सर्व सामाजिक धार्मिक स्थळे सुरू केली जावीत अशी भूमिका घेणारे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. एकीकडे राज्यातील बियर बार उघडे केले आहेत, मद्य विक्रीही सुरू आहे. सरकार मधील तीन पक्षांना दारू जवळची वाटत आहे, मात्र धार्मिक स्थळ महत्त्वाचे वाटत नाहीत. हे गेल्या अनेक वर्षांपासून जातीय राजकारण करत आहेत. त्यांना मात्र धार्मिक स्थळाबाबत आस्था का नाही? असा प्रश्नदेखील इम्तियाज जलील यांनी विचारला.
राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत, त्यापूर्वीच दारू विक्रीही सुरू करण्यात आलेली आहे. मात्र हे सरकार सर्व धर्माचे धार्मिक स्थळे उघडायला तयार नाही. यासाठी काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते, त्यावेळी मात्र त्याला धार्मिकतेचा रंग देण्यात आला. ज्या मंदिराच्या प्रश्नावरुन शिवसेना राजकारणात आली, मोठी झाली, यश मिळालं. मात्र त्यांचं सरकार सत्तेत असताना त्यांना मात्र मंदिरांचा विसर पडला आहे का? असा प्रश्न देखील इम्तियाज जलील यांनी केला आहे.
जलील पुढे म्हणाले की, माझी भूमिका बदललेली नाही, धार्मिक स्थळं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाला वेगळे रूप देऊन काही जणांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे आंदोलन मला थांबवावे लागले. जातीय तणाव निर्माण होऊ नये हा माझा हेतू होता. सरकारने हा प्रश्न ना पूर्वी गंभीरतेने घेतला ना आज घेत आहे. त्यामुळे मंदिराबाहेर फुलं, फळं विकणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”