हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यशवंत सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आक्रमक भूमिका घेतलेल्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना धमकी देण्यात आली आहे. स्वतः मेधा कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शेखर चारेगावकर यांचा भाऊ शार्दुल चरेगावकर यांनी नाशिक मधल्या मध्यस्थामार्फत ही धमकी दिली असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, यशवंत सहकारी बँकेत १५० कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असून यात बँकेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा प्रमुख समावेश आहे. त्यामुळे शेखर चरेगावकर यांचा भाऊ शार्दुल चरेगावकर यांच्याकडून मला धमकवलं जात आहे. तसंच सहकार खात्यातील अधिकारी यांच्यावर दबाव टाकला जात आहे. तुम्ही याप्रकरणात गप्प बसा अन्यथा तुमचे मागील वेळी सारखं तिकीट कापू आणि आता बोलला तर, बोलणं बंद करू अशी धमकी शेखर चारेगावकर यांचा भाऊ शार्दुल चरेगावकर यांनी नाशिक मधल्या मध्यस्थामार्फत दिली असा आरोप खासदार मेधा कुलकर्णी यांनी केला.
त्या पुढे म्हणाल्या, यशवंत सहकारी बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमार्फत कराड इथल्या अनेक लोकांची फसवणूक करण्यात आली आहे. अनेकांच्या नावावर बोगस कर्ज घेकती आहेत. सदर कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवलेले आहेत. सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा फायदा केला आहे. त्याचप्रमाणं बँकेमधील पैशाचा विनीयोग स्वतःच्या खाजगी मालमत्ता घेण्यासाठी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली असल्याची माहिती मेधा कुलकर्णी यांनी दिली.




