मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्या प्रकृतीत सात दिवस उपचार करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. आज त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना नागपूरहून मुंबईला (mumbai) हलविण्यात येत आहे. नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांना घरीच क्वॉरंटाइन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ११ ऑगस्ट रोजी नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, नवनीत राणा यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांना मुंबईत आणण्यासाठी विमानाची व्यवस्था करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्याला वेळ लागणार असल्याने तातडीने त्यांना बाय रोड मुंबईत आणण्यात येत आहे. दोन तासांपूर्वीच नवनीत राणा यांनी मुंबईला येण्यासाठी नागपूर सोडले आहे. त्यांच्यासोबत त्यांचे पती, आमदार रवी राणा आहेत.
नवनीत राणा यांना मुंबईत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. याआधी रवी राणा यांच्यासह त्यांची दोन्ही मुले, सासू-सासऱ्यांसह कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर उपाचर सुरू आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवरही वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून मुलांवर घरीच अमरावतीला उपचार सुरू आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”