खासदार संभाजी छत्रपतींचे मुख्यमंत्र्यांना पत्र; म्हणाले मागण्या मान्य करा …अन्यथा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा क्रांती मूक मोर्चा आंदोलनातील काही मागण्यांबाबत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आता पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून मागण्यांच्या पूर्ततेबाबत जाब विचारला आहे. “प्रशासनाने मागितलेला कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे मागण्यांची पूर्तता लवकर करा अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू !,” असे खासदार संभाजी छत्रपतीं यांनी पत्रात म्हंटले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटल आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजास शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या काही मागण्या समाजामार्फत आम्ही राज्य शासनाकडे मांडल्या होत्या.

कोल्हापूर येथे झालेल्या मूक आंदोलनानंतर दि. 17 जून रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. मागण्यांची पूर्तता करणेबाबत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणेसाठी कालावधी मागितला होता.

याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही. संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी, अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू, असे पत्रात म्हंटले आहे.

Leave a Comment