पुणे । मराठा समाजाला SCBC प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे आग्रही आहेत. मात्र, ‘नॅशनल कमिशन फाॅर बॅकवर्ड क्लास’ संदर्भात झालेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीला छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेत पाठिंबा दिला होता. त्यामुळे छत्रपती संभाजीराजेंना मराठा समाजाला SCBC प्रवर्गातून आरक्षण मागण्याचा आग्रह धरण्याचा नैतिक अधिकार नाही, असा दावा मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मिडियावरुन प्रसारित केला आहे. यात त्यांनी खासदार छत्रपती संभाजी राजेंच्या दुट्टप्पी भूमिकेवर बोट ठेवलं आहे.
‘मराठा आरक्षणासंदर्भात OBC, SCBC आणि EWS या संदर्भात काही वाद सुरु आहेत. त्याबाबत काही खुलासे करणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने आॅगस्ट २०१८ ला १०२ वी घटनादुरुस्ती केली आहे. आणि या घटनादुरुस्तीत ‘नॅशनल कमिशन फाॅर बॅकवर्ड क्लास’ला घटनेचे संरक्षण देऊन त्याला काही विशेष अधिकार दिले आहेत. त्याला अधिकार प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारच्या स्तरावर कुठलेही आयोग निर्माण करता येत नाहीत,”
”आॅगस्ट २०१८ चा कायदा म्हणतो की कुठल्याही राज्य सरकारला आरक्षणासाठी काही तरतुदी करता येणार नाहीत. कुठलाही प्रवर्ग निर्माण करता येणार नाही. ‘नॅशनल कमिशन फाॅर बॅकवर्ड क्लास’ याबाबत राज्यसभेत ज्यावेळी मतदान झाले, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने व्हीप काढल्यामुळे राज्यसभेच्या त्यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी त्याच्या बाजूने मतदान केले. छत्रपती संभाजीराजेंनी सुद्धा १०२ व्या घटनादुरुस्तीच्या बाजूने मतदान केले आहे,” असे गायकवाड म्हणाले.
गायकवाड पुढे म्हणाले, ”SCBC प्रवर्ग राज्य सरकारने निर्माण केला आहे. १०२ व्या घटना दुरुस्ती प्रमाणे तो रद्द ठरतो, हे मला आपल्या लक्षात आणून द्यायचे आहे. ‘नॅशनल कमिशन फाॅर बॅकवर्ड क्लास’ छत्रपती संभाजीराजेंनी पाठिंबा दिला आहे. जानेवारी २०१९ ला १०३ वी घटनादुरुस्ती झाली. EWSची ही घटनादुरुस्ती होत असताना राज्यसभेतील सर्व खासदार उपस्थित होते. द्रवीड मुन्नेत्र कळघम आणि कम्युनिस्ट मिळून अठरा खासदारांनी त्याला विरोध केला. राज्यसभेत १५५ जणांनी मतदान केले. संभाजीराजेंनीही याच्या बाजूने मतदान केले. याचा अर्थ याला त्यांचा पाठिंबा होता,”
”त्यामुळे राज्यात SCBC चा आग्रह धरण्याचा छत्रपती संभाजीराजेंना त्यांना नैतिक अधिकार रहात नाही. राज्यसभेच घटनादुरुस्तीला पाठिंबा द्यायचा व राज्यात सार्वजनिकरित्या वेगळी भूमीका घ्यायची, हे बरोबर नाही. मला छत्रपती घराण्याबद्दल, छत्रपती संभाजीराजेंबद्दल आदर आहे. मात्र या वेगळ्या भूमीका लोकांना कळाव्यात म्हणून मी हे स्पष्टीकरण दिले आहे,” असेही गायकवाड म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”