सरपंचाना विमा संरक्षण देण्याची खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गावामध्ये जोखमीचे काम करणा-या सरपंचाना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह उप मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांकडे केली आहे. गावातील कोरोना परिस्थिती हाताळताना सरपंचाना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विमा कवच देण्यात यावे असे निवेदन सरपंच परिषद, पुणेच्या पदाधिका-यांनी खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे दिले होते.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी तशी मागणी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ग्राम विकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून केली आहे. खा.श्रीनिवास पाटील यांनी पत्रात म्हटले आहे, कोविड-19 चा सामना करत असताना शासकीय कर्मचा-यांच्या सोबत प्रामुख्याने सरपंच हे गावात प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असतात. संपूर्ण गावातील जनतेच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्या कडून घेतली जाते. बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरणात ठेवणे, सर्वांना मास्क वापरण्यासाठी बंधनकारक करणे, शासकीय नियमापेक्षा जास्त लोकांना एकत्र येऊ न देता लग्न समारंभात संख्येचे बंधन पाळण्यास भाग पाडणे, दुखःद प्रसंगात समक्ष भेटून मदत करणे, गावात संसर्ग वाढू नये यासाठी खबरदारी घेऊन जंतूनाशक फवारणी करणे, जे लोक ऐकत नसतील त्यांना प्रशासनामार्फत योग्य समज देणे, गरजूंना धान्य वाटप करणे, शेतक-यांना हंगामी मदत करणे तसेच शासनाकडून वेळोवेळी मिळालेल्या कोरोना प्रतिबंधक सूचनांची गावात काटेकोरपणे अंमलबजावणी करणे या सारखी विविध कामे त्यांना करावी लागतात.

लोकप्रतिनिधी म्हणून गावातील लोकांशी त्यांचा अनेकदा थेट संपर्क येत असतो. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने सरपंचांना विमा संरक्षण देण्यात यावे. शासकीय कर्मचा-यांसोबत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचा विमा उतरविता यावा यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अधिकार देता येतील काय अथवा शासनामार्फत ग्रामपंचायतीमधील कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांचा गट विमा उतरवता येईल का याबाबतही आपण मार्ग काढावा अशी विनंती देखील खा. पाटील यांनी केली आहे.

Leave a Comment