खासदार श्रीनिवास पाटील यांच्या गावात ग्रामपंचायत व लोकसहभागातून 30 बेडचे विलगीकरण कक्ष सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सेवाभावी वृत्तीने सुरू केलेले विलगीकरण कक्ष कोरोना बाधित रूग्णांसाठी संजीवनी ठरेल असा विश्वास खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला. पाटण तालुक्यातील मारूल हवेली येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या 30 बेडच्या विलगीकरण कक्षाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, राष्ट्रवादीच्या आय.टी.सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, पोलिस निरिक्षक एन.आर.चौखंडे, राजाभाऊ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. खा.पाटील म्हणाले, घरातील विलगीकरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, तेथे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे बाधित रुग्णांचे विलगीकरण कक्ष उभारावेत असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. त्यास अनुसरून येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे.

सारंग पाटील म्हणाले, कोरोना काळात स्वयंशिस्त, बंधने, प्रतिबंधात्मक नियमांचे पालन न केल्यामुळे असे विलगीकरण कक्ष उभाराण्याची वेळ येऊ लागली आहे. मात्र हे दुर्दैवी असून असे कक्ष उभे करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये. त्यासाठी दक्षता पाळावी. लोकसहभागतून हे सुसज्ज कक्ष सुरू करण्यात आले असून त्यामध्ये शौचालय, स्नानगृह, शुध्द पाणी, वाचनालय, प्राथमिक उपचार अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

श्रीरंग तांबे म्हणाले, पाटण तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचे प्रमाण कमी येण्यासाठी असे कक्ष महत्वाची भूमिका पार पाडत आहेत. नागरिकांनी खबरदारी घेऊन कोरोना विरोधातील लढाईत एकजूट दाखवावा. प्रारंभी स्वागत नितिन शिंदे यांनी केले. आभार राजेंद्र नांगरे यांनी मानले.

Leave a Comment