आनेवाडी,खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलदरवाढीवरून खा.उदयनराजे भोसले आक्रमक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके

पुणे -राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यावरील टोलच्या दरात सुमारे 5 टक्के केलेली टोल दरवाढ ही अन्यायकारक आणि प्रवासी आणि संबंधीतांच्या संयमाचा अंत पहाणारी आहे. वास्तविक या रस्त्याचे काम सन 2013 मध्ये पूर्ण होणार होते. मुळची मुदत संपूनही सुमारे 8 वर्षे झाली तरी काम पूर्ण झालेले नाही, म्हणूनच 5 टक्के वाढ करण्याऐवजी जुन्या टोलदरात 5 टक्केपेक्षा जास्त टोल करकपात करावी, अशी मागणी भाजपचे खासदार छ.उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे भोसले हे म्हणतात की, सातारा ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना अनेक गैरसोयींचा सामना प्रवाश्यांना करावा लागत आहे. सेवा रस्ते अत्यंत खराब आहेत. काही ठिकाणी सेवा रस्ते आहेत का नाहीत हे देखील समजत नाही. रस्त्यांवरील खड्डयांची तर मोजदाद ही करता येत नाहीत, इतके असंख्य खड्डे आहेत. खरंच हा राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न वाहनचालकांना आणि प्रवाशांना पडत असतो.

दिशादर्शक-स्थलदर्शक फलकांची वानवा आहे. काही वेळा अपरिचित वाहनचालकांला एखादे गांव कधी आपण मागे टाकले हे देखिल कळत नाही. शेजारील कर्नाटक राज्यातील याच राष्ट्रीय महामार्गावरुन आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्यांपेक्षा कमी टोल दर देवून, प्रवास करणारे वाहनचालक आणि प्रवाशी हे सातारा पुणे प्रवासादरम्यान प्रत्येक असुविधेबाबत आणि खडयांबाबत अक्षरश: लाखोली वहात असतात, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

तसेच यासारख्या अनेक सुविधांची असलेल्या वानवा लक्षात घेता, सध्याच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे ऑथेंरिटी ऑफ इंडियाने) आणि टोल चालवणा-या रिलायन्स व्यवस्थापनाने टोल दरवाढ करुन,  प्रवाशी आणि वाहनचालक / धारकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यांनी केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. तसेच,नुसती दरवाढ मागे न घेता, जुन्या दरात 5 टक्यापेक्षा जास्त रक्कमेची टोल करकपात करावी, अशी आग्रही मागणी नागरीक- प्रवाशी आणि वाहनचालकांच्या वतीने आम्ही करत आहोत, असेही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे

Leave a Comment