हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super kings) आण, बाण आणि शान असलेल्या महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) आयपीएल मध्ये मोठा कारनामा केला आहे. आयपीएल इतिहासात चेन्नई सुपर किंग्स कडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये धोनी पहिल्या स्थानावर पोचला आहे. धोनीने सुरेश रैनाला मागे टाकत हा भीम पराक्रम केला आहे. चेन्नई कडून खेळताना रैनाने १७६ सामन्यांमध्ये ४६८७ धावा केल्या होत्या, काल आरसीबी विरुद्धच्या सामन्यात ताबडतोब बॅटिंग करत धोनीने रैनाला पिछाडीवर सोडले. धोनीने चेन्नईसाठी आत्तापर्यंत ४६९९ धावा केल्या आहेत. त्यासाठी त्याने तब्बल २३६ सामने खेळले आहेत.
धोनी आणि रैना शिवाय चेन्नई सुपर किंग्स कडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंची यादी काढली तर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसचे नाव येते. फाफ डु प्लेसिसने चेन्नई कडून खेळताना २७२१ धावा केल्या आहेत. सध्या, डु प्लेसिस सीएसकेकडून खेळत नाही तर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. त्यामुळे धोनीचा विक्रम फाफ मोडू शकत नाही. चेन्नई सुपर किंग्जचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. २८ वर्षीय ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्स साठी आत्तापर्यंत ६८ सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याच्या बॅट मधून ६७ डावांमध्ये ४१.२४ च्या सरासरीने २४३३ धावा आल्या आहेत. धोनीचा विक्रम मोडण्यासाठी ऋतुराजाला अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागेल.
दरम्यान, काल रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात भलेही चेन्नई सुपर किंग्स चा पराभव झाला असेल, परंतु डावाच्या अखेरच्या षटकात धोनीने ९ व्या क्रमांकावर येऊनही ताबडतोब फलंदाजी केली. धोनीने अवघ्या १६ चेंडूंत १८७.५० च्या स्ट्राईक रेटने नाबाद ३० धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार मारले. परंतु धोनीच्या उत्कृष्ट कामगिरीनंतरही, चेन्नईला अपयशाचा सामना करावा लागला आणि आरसीबी विरुद्ध ५० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. धोनी खूप उशीरा बॅटिंगला आल्याने त्याच्यावर टीकेची झोड सुद्धा उठू लागलीय. खरं तर चेन्नई सुपर किंग्सला काल खऱ्या अर्थाने धोनीच्या आक्रमक फलंदाजीची गरज होती, परंतु धोनी ९ व्या क्रमांकावर बॅटिंगला आला.. त्याच्या आधी आर अश्विन आणि जडेजा फलंदाजीला आले.. धोनी जेव्हा मैदानात उतरला तेव्हा सामना चेन्नईच्या हातून पूर्णपणे गेला होता.