हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला आयपीएल मधून गाशा गुंडाळावा लागला. चेन्नईचा संघ आयपीएल मधून बाहेर गेल्यानंतर महेंद्रसिंघ धोनीचे (MS Dhoni Retirement) स्वप्न तुटलं. यंदाची आयपीएल धोनीची शेवटची आयपीएल असू शकते अशा चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आता धोनी पुन्हा आपल्याला पिवळ्या जर्सीत पाहायला मिळेल कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे. मात्र आता धोनीच्या निवृत्तीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. धोनीनं अंतिम निर्णयासाठी वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांना थोडाफार दिलासा मिळाला आहे.
निवृत्तीच्या निर्णयापूर्वी धोनी विचार करणार – MS Dhoni Retirement
आरसीबी विरुद्धच्या पराभवानंतर धोनी दुसऱ्याच दिवशी रांचीला गेला. पण धोनीने CSK मधील कोणालाही सांगितले नाही की तो आयपीएल सोडणार आहे. त्याने व्यवस्थापनाला सांगितले आहे की अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तो काही महिने विचार करेल आणि मगच निवृत्तीबद्दल (MS Dhoni Retirement) त्याचा पुढचा निर्णय जाहीर करेल. धोनीने चेपॉकवर शेवटचा सामना खेळण्याचे वचन संघाला दिले होते ते तो पाळेल अशी आशा व्यवस्थापनाला आहे. महत्वाची बाब म्हणजे धोनीचा खेळ चांगलाच राहिला आहे. शनिवारी आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सुद्धा त्याने जवळपास 200 च्या स्ट्राइक-रेटने 25 धावा केल्या होत्या तसेच त्याने ४ ओव्हर फलंदाजी केली होती.
क्रिझमधून धावत असताना सुद्धा त्याला कोणताही त्रास झाला नाही, अगदी आरामात तो सिंगल- डबल धावा पूर्ण करत होता. धोनी कुठेही दमलेला दिसला नाही तसेच त्याच्यात कोणतीही अस्वस्थता पाहायला मिळाली नाही. उलट स्टेडियमच्या बाहेर चेंडू घालवत आपण आजही मोठमोठे शकतो हे धोनीने दाखवून दिले हा त्याचा प्लस पॉईंट आहे. पुढील वर्षी आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे आणि प्रत्येक संघांला जास्तीत जास्त पाच खेळाडू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. सीएसकेचे चार खेळाडू आहेत – रुतुराज गायकवाड, जडेजा, दुबे आणि मथीशा पाथिराना … ज्यांना निश्चितपणे संघात कायम ठेवले जाईल. अशा परिस्थितीत नवीन खेळाडूंना खरेदी करण्यासाठी धोनी जास्त पैसे न रोखता सर्वात कमी रिटेन्शन स्लॉटची निवड करू शकतो.