हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महेंद्रसिंह धोनी… तुमचा आमचा लाडका धोनी.. काही लोकांसाठी माही तर काहींसाठी थाला… देशातील सर्वात मोठा फॅनबेस असलेला हा महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) … तो मैदानात उतरताच धोनी धोनीचा नारा संपूर्ण स्टेडियम मध्ये गुंजताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हाच धोनी आगामी IPL २०२५ खेळणार कि नाही याबाबत चाहत्यांच्या मनात संभ्रम आहे. धोनी सध्या ४३ वर्षाचा झाला आहे. त्यातच त्याने मागच्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद सोडल्याने तो आयपीएल मधून निवृत्ती जाहीर करेल अशी भीती त्याच्या चाहत्यांना आहे. मात्र यावर खुद्द धोनीनेच खुलासा करत आपण २०२५ च्या आयपीएल स्पर्धेत खेळणार कि नाही याबाबत माहिती दिली आहे.
आगामी IPL २०२५ च्या पार्श्वभूमीवर मेगालिलाव आणि प्लेयर रिटेन्शन पॉलिसीबाबत BCCI आणि आयपीएल फ्रँचायझी मालक यांच्यात बैठक झाली. यानंतर एका कार्यक्रमात बोलताना महेंद्रसिंह धोनीने आपल्या आयपीएल करिअरवर भाष्य केलं. यावेळी त्याने स्पष्ट असं काहीही सांगितलं नाही, मात्र तो म्हणाला आता चेंडू आमच्या पारड्यात नाही. एकदा का नियम जाहीर झाले की मी निर्णय घेईन. खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत काय निर्णय होतो तो बघूया, त्यानंतर मी निर्णय घेईन आणि हा निर्णय संघाच्या हिताचा असेल असं माहीने सांगितलं.
यावेळी महेंद्रसिंह धोनीने त्याच्या आवडत्या गोलंदाजाचे नावही सांगितले. भारताचा स्टार जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा आपला आवडता गोलंदाज असल्याचे धोनीने म्हंटल. तर दुसरीकडे विराट कोहली कि रोहित शर्मा यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण हे मात्र धोनीने सांगितलं नाही. सर्वोत्तम फलंदाज निवडणे कठीण आहे, मी कोण्या एकाची निवड करू शकत नाही असं धोनी म्हणाला. मी ज्यांना फलंदाजी करताना पाहतो ते चांगले खेळत आहेत. जोपर्यंत टीम इंडिया जिंकत आहे तिथपर्यंत मला एकही फलंदाज निवडायचा नाही. मला आशा आहे की ते संघासाठी धावा करत राहतील.”, असं महेंद्रसिंह धोनीने सांगितलं.
एकदिवसीय विश्वचषक 2019 च्या उपांत्य फेरीतील पराभवावर सुद्धा धोनीने भाष्य केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यात धोनी धावबाद झाला आणि भारताचे आव्हान संपुष्टात आलं होते, याबाबत बोलताना माही म्हणाला, मला माहित होते की हा माझा शेवटचा विश्वचषक असेल, त्यामुळे विजेत्या संघात असणे खूप छान वाटले असते. परंतु हा एक हृदयद्रावक क्षण होता अशी खंत धोनीने व्यक्त केली