MSRTC : राज्यातील ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली एसटी बसचं आता लवकरच रुपडं पालटणार आहे. राज्याच्या वाड्या वस्त्यांवर आजही प्रवाशांना वेळेत पोहोचवणारी ‘लालपरी’ आता अत्याधुनिक होणार असून राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 2475 नवीन परिवर्तन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे. सध्या याव्य प्रोटोटाईप च्या निर्मितीचं काम सुरू असून ऑक्टोबर मध्ये नवीन बस (MSRTC) ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे मुंबई सह अन्य मार्गावर या बसेस प्रवाशांच्या सेवेमध्ये धावणार आहेत. पुणे विभागाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पुणे विभागाला सुमारे 150 बसेस मिळणार आहेत. एम एस आर टी सी च्या अनेक गाड्या ह्या जुन्या असून काही गाड्यांना देखभालीची मोठी आवश्यकता आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे अनेक प्रवाशांनी (MSRTC) एमएसआरटीसी कडे पाठ फिरवाल्याचेही दिसून आले.
एवढेच नाही तर याचा परिणाम एम एस आर टी सी च्या आर्थिक गणितावर होताना दिसतोय. मात्र महिला सन्मान आणि अमृत ज्येष्ठ नागरिक अशा योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे गाड्यांच्या संख्येत मात्र घट होत आहे. अशावेळी नवीन बसेस ह्या प्रवाशांसाठीच नव्हे तर एसटी महामंडळासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे. आत्ताच्या घडीला महामंडळाच्या ताफ्यामध्ये 15800 बसेस आहेत. यातील सुमारे 14000 बस प्रत्यक्ष प्रवासी सेवेत असल्याचे माहिती आहे.
कशी असेल नवी बस? (MSRTC)
- एसटी महामंडळाच्या या नव्या बसेस नऊ मीटर लांबीच्या असून दोन बाय दोन स्वरूपाच्या आहेत.
- या बसची प्रवासी क्षमता प्रत्येकी 44 इतकी असेल
- या एका बसची किंमत सुमारे 38 लाख रुपये आहे.
- यासाठी 1012 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
- पहिल्या टप्प्यामध्ये 300 बसेस दाखल होतील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर बस दाखल होतील.
- महत्त्वाचं म्हणजे नव्या बस महामंडळाच्या स्वमालकीचे असतील.
खासगी कंपनीला कंत्राट (MSRTC)
या बसेसच्या बाबतीतली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महामंडळ या बसेसच्या सांगाड्याची खरेदी करून मध्यवर्ती कार्यशाळेत बस बांधणी करते. बांधणी झाल्यावर मध्यवर्ती कार्यालयाकडून विविध विभागांना बसेस वितरण केल्या जातात. मात्र यावेळी कंत्राट देण्यात आलेली खाजगी कंपनीच सांगाड्याची बांधणी करणार आहे. त्यामुळे महामंडळाला जास्त खर्च करावा लागणार असल्याची माहिती आहे.
याबाबत एका माध्यमाला माहिती देताना महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस (मुंबई ) श्रीरंग बर्गे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की नवीन बसेस दाखल होणं प्रवाशांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे. (MSRTC) मात्र महामंडळाच्या कार्यशाळा सक्षम असताना गाड्यांचे बांधणी बाहेरच्या कंपनीकडून केली जाणार आहे. असे पुन्हा होता कामा नये महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतच नवीन गाड्यांची बांधणी झाली पाहिजे असं मत बरगे यांनी व्यक्त केले.