हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC Buses । महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मागच्या काही दिवसापासून ऍक्शन मोड वर आलं आहे. एसटी ची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने MSRTC कडून वेगवेगळ्या उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे ज्या मार्गावर एसटी बस तोट्यात येतेय अशा मार्गांवरील सेवा परिवहन मंडळाकडून बंद करण्यात येणार आहेत. महसूल आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यापक मार्ग पुनर्रचना धोरणाचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. मात्र सध्या हे फक्त पुण्यातच केले जाणार आहे. इतर शहरांबाबत अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
एसटीचा महसूल वाढवण्यासाठी परिवहन मंडळाने (MSRTC Buses ) दुहेरी चाल खेळली आहे. एकीकडे नफा न देणाऱ्या सेवा बंद करण्यात येतील तर दुसरीकडे लांब पल्ल्याच्या आणि जास्त मागणी असलेल्या मार्गांवर नवीन सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसेस तैनात केल्या जातील. त्याठिकाणी सध्याच्या जुन्या बसेस हळूहळू बंद केल्या जातील. चालू वर्षाच्या अखेरीस, पुणे विभागाच्या ताफ्यात १५० नवीन बसेस समाविष्ट केल्या जातील असं बोललं जातंय. महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MSRTC च्या कामकाजाविषयी सादर केलेल्या श्वेतपत्रिकेच्या पार्श्वभूमीवर ही पुनर्रचना करण्यात आली आहे.
सध्या पुण्यात किती बस गाड्या ? MSRTC Buses
सध्या, पुणे विभाग शहर आणि जिल्ह्यात १४ डेपो आणि ४२ बस स्थानके आहेत. या एकूण बस स्थानकात जवळपास रे ८५० बसेस असून यामध्ये ६४ इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस, ३६ व्होल्वो ‘शिवशाही’ लक्झरी बसेस आणि २०० सीएनजी बसेस चा समावेश आहे. विविध डेपोंमधून लांब पल्ल्याच्या सेवांसाठी एकूण ७० नवीन बसेस आधीच तैनात करण्यात आल्या आहेत आणि उर्वरित बस गाड्या टप्प्या टप्याने सुरु केल्या जातील. एमएसआरटीडी पुणे विभागीय नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं कि, २०२४-२५ या आर्थिक वर्षात, फक्त स्वारगेट आणि शिवाजीनगर डेपोंमधून बसेसनी मासिक ५५ कोटी रुपये महसूल मिळवला. या पुनर्रचना योजनेद्वारे हा आकडा ६५ कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. “ऑपरेशनल तोटे कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक सेवा पुरवठ्यात वाढ करण्यासाठी ही पुनर्रचना आवश्यक आहे. त्यामुळे व्यवहार्य नसलेले मार्ग यापुढे चालू राहणार नाहीत.