‘या’ कारणामुळं एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । महाराष्ट्र राज्य शासन परिवहन मंडळ (MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सध्याच्या आर्थिक संकटाच्या काळात पगार कपातीचा सामना करावा लागणार आहे. कर्मचाऱ्यांना उशिरानं देण्यात येणाऱ्या मे महिन्याच्या पगारात तब्बल ५० टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. एका परिपत्रकाद्वारे या मोठ्या निर्णयाबाबदची माहिती देण्यात आली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी सेवा मोठ्या प्रमाणात बंदच होती. परिणामी आधीच तोट्यात असणाऱ्या महामंडळाच्या तिजोरीला आणखी फटका बसल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना ७५ टक्के पगार देण्यात आला होता. त्यानंतर एप्रिल महिन्यात त्यांच्या हाती शंभर टक्के पगार दिला गेला होता. पण, आता मे महिन्याचा पगार उशिरानं होणार असून, त्यातही ५० टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांपुढं एक आव्हानच उभं राहिलं आहे. पगार कपातीचा हा निर्णय आणि उशिरानं हाती येणारा निम्मा पगार यांमुळं सध्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.

राज्यात सर्वत्र कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असतानाच अशा परिस्थितीमध्ये अत्यावश्यक सेवांमध्ये एसटीतील कर्मचाऱ्यांनी त्यांचा जीव धोक्यात टाकत प्रवाशांना सेवा देऊ केली. मुळात एसटीमध्ये काम करणाऱ्या चालक, वाहक आणि कार्यशाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात फरक आहे. यामधील बहुतांश कर्मचाऱ्यांचं नियोजन हे महिन्याच्या पगारावरच असतं हा मुद्दा अधोरेखित करत त्यांनी संपूर्ण वेतनाची मागणी उचलून धरली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”