हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC । महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनात आता ऐतिहासिक बदल करण्यात येणार आहेत. कर्नाटक प्रमाणेच आता महाराष्ट्रात पाच नवीन प्रादेशिक विभागांची स्थापना करण्याची घोषणा, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (MSRTC) ने केली आहे. कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि विकेंद्रित निर्णय घेण्याच्या उद्देशाने महामंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरात ऑपरेशनल नियोजन वाढेल, स्थानिक प्रशासन मजबूत होईल आणि समन्वय सुव्यवस्थित होईल अशी आशा आहे.
आतापर्यंत एसटी महामंडळात आगार (तालुका), विभागीय कार्यालय (जिल्हा) आणि मध्यवर्ती कार्यालय (राज्यस्तर) अशी त्रिस्तरीय रचना होती. मात्र आता ५ नवीन प्रादेशिक विभागांची स्थापना करण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री आणि एमएसआरटीसीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनांनुसार, एमएसआरटीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी नवीन प्रादेशिक विभागांच्या स्थापनेची पुष्टी करणारे अधिकृत परिपत्रक जारी केले. खरं तर मंत्री सरनाईक यांच्या कर्नाटक भेटीनंतर ही पुनर्रचना करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांनी कर्नाटक दौऱ्यावेळी तेथील वाहतूक मॉडेलचा अभ्यास केला, त्यातून प्रेरणा घेत त्यांनी महाराष्ट्रासाठी अधिक विस्तृत मॉडेल आणले आहे.
कोणकोणत्या विभागांची स्थापना- MSRTC
मुंबई, नाशिक, नागपूर, पुणे आणि अमरावती असे हे ५ नवीन प्रादेशिक विभाग असतील. प्रत्येक विभागात अनेक विद्यमान कार्यरत विभाग असतील आणि त्यांचे मुख्यालय मोक्याच्या ठिकाणी असेल. प्रत्येक प्रादेशिक समितीचे प्रमुख म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांची आधीच नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन पाच विभागांमुळे स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रिया जलद होईल, आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा मिळेल. महाराष्ट्रातील एसटी महामंडळ हे कार्यक्षेत्राने मोठे असूनही निर्णयासाठी सर्व काही मुंबईवर अवलंबून होते. त्यामुळे स्थानिक स्तरावर निर्णय घ्यावा लागला, तरी वेळ लागायचा. आता मात्र याचे विकेंद्रीकरण होऊन ५ नवे प्रादेशिक विभागच त्या त्या विभागाबाबत निर्णय घेतील.