हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MSRTC । वाढत्या आर्थिक आव्हानांवर मात करण्यासाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC ) लवकरच किरकोळ इंधन व्यवसायात प्रवेश करणार आहे. त्यानुसार, आता ST महामंडळ आपल्या स्वतःच्या पंपा वरून पेट्रोल- डिझेल विकणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. हा उपक्रम राज्य आणि केंद्र सरकारच्या संयुक्त भागीदारीद्वारे राबविला जात असल्याचे सरनाईक यांनी सांगितलं.
प्रताप सरनाईक म्हणाले, नजीकच्या काळात , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक विश्वासार्ह आणि सुलभ इंधन स्टेशन ऑफर करेल. यामुळे महामंडळाला व्यावसायिक इंधन किरकोळ विक्रीद्वारे एक नवीन महसूलाचा स्रोत निर्माण होईल. सध्या एसटी महामंडळाची परिस्थिती अतिशय नाजूक आहे. असे असतानाही MSRTC प्रवासी तिकिटांच्या उत्पन्नावरील आपले अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. “केवळ प्रवासी तिकिटांच्या उत्पन्नावर अवलंबून राहण्यात अर्थ नाही. अशावेळी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करणे आवश्यक आहे,” असे सरनाईक यांनी म्हंटल.
सध्या 251 ठिकाणी ST चे पेट्रोल पंप – MSRTC
ते पुढे म्हणाले, MSRTC ला इंधन व्यवस्थापनाचा दशकांचा अनुभव आहे. गेली 70 वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांच्या कडून डिझेल इंधन विकत घेत आहे. सध्या 251 ठिकाणी एसटीच्या स्वतः च्या जागेवर पेट्रोल पंप उभारले असून या द्वारे केवळ एसटीच्या बसेस साठी डिझेल इंधनाचे वितरण होते. या कौशल्याचा वापर करून, महामंडळ आता इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसह केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांच्या भागीदारीत किरकोळ इंधन केंद्रे चालवण्याची योजना आखत आहे. हा करार केंद्र आणि राज्य पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांमध्ये होणार असल्याने, महसूल वाटप मॉडेल पारदर्शकता सुनिश्चित करेल अशा विश्वासही प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
हे नवीन आउटलेट एमएसआरटीसीच्या मालकीच्या जमिनीवर, विशेषतः महामार्ग आणि वर्दळीच्या रस्त्यांवर उभारण्यात येतील. अशा भूखंडांच्या माहितीसाठी सर्वेक्षण करण्यात आले असून साधारणपणे २५ बाय ३० मीटर जागा निश्चित करण्यात येत आहेत. या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही तर रिटेल शॉप देखील उभारले जाणार आहेत. त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल! यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक भागिदारी तुन चांगला महसूल देखील मिळू शकतो.




