हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन MTDC EV Chargers । आजकाल मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची चांगलीच चलती आहे. पेट्रोलच्या खर्चापासून सुटका करण्यासाठी अनेकजण नवनवीन इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. परंतु चार्जिंगच्या मर्यादा असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी किंवा कुठेही पर्यटन करण्यासाठी इलेक्ट्रिक गाडी घेऊन जाणे थोडं जोखमीचं ठरत. मात्र आता चिंता करण्याची गरज नाही. कारण महारष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यावर उपाय काढला आहे. महारष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने जवळपास ४९ रिसॉर्ट्समध्ये EV चार्जिंग स्टेशन बसवणार असल्याची घोषणा केली आहे.
महाराष्ट्राच्या इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देणे, प्रदूषण कमी करणे आणि आधुनिक सुविधांद्वारे पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हा उपक्रम (MTDC EV Chargers) सुरु केला आहे. नाशिकच्या निसर्गरम्य गंगापूर धरण रिसॉर्ट्सवर चार चार्जिंग पॉइंट्स उभारून यापूर्वीच याची सुरुवात झाली आहे. प्रत्येक ठिकाणी दोन चार्जिंग स्टेशन असतील जे एकाच वेळी चार इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करतील. पायाभूत सुविधा खाजगी ऑपरेटर्सकडून १० वर्षांच्या भाडेतत्वावर असेल. चार्जिंग स्टेशन्सच्या सेटअप, ऑपरेशन आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्या खाजगी कंत्राटदारांना प्रत्येक रिसॉर्टमध्ये सुमारे ५० चौरस मीटर जागा भाड्याने देण्याची महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची योजना आहे.
कोणत्या शहरात किती चार्जिंग स्टेशन? MTDC EV Chargers
४९ चार्जिंग स्टेशन्सचे वितरण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये केले जाईल. यामध्ये नागपूर विभागात सर्वाधिक १३ चार्जिंग स्टेशन्स असतील, त्यानंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये १०, पुणे ९, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७ आणि मुंबईजवळ ६ चार्जिंग पॉइंट्स असतील. नाशिकमध्ये, गंगापूर धरण रिसॉर्ट्समधील दोन स्थानकांव्यतिरिक्त, अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा आणि शिर्डी येथील एमटीडीसीच्या मालमत्तेवर सुद्धा चार्जिंग पॉइंट्स इंस्टाल केले जातील.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या प्रकल्पात भागीदारी करण्यास इच्छुक कंपन्यांकडून (EoI) मागवल्या आहेत. या EoI सादर करण्याची अंतिम तारीख ४ जून आहे. आजकाल मुंबई, पुणे आणि नागपूर सारख्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी खूपच वाढली आहे. त्यातच आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ४९ नवीन चार्जिंग स्टेशन्स बसवण्याचा निर्णय घेतल्याने इलेक्ट्रिक गाडयांना आणखी चालना मिळणार आहे. तसेच पर्यावरणाचेही संवर्धन होणार आहे.