Saturday, February 4, 2023

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा; सरकारकडून उपचाराचे दर निश्चित

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित करण्यात आले आहेत. यासंदर्भातील आरोग्य विभागाच्या अधिसूचनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली. दरनिश्चिती करतांना शहरांचे वर्गीकरण करण्यात आले असून निश्चित केलेल्या दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत

राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वीच जाहिर केला होता. त्यानुसार महात्मा फुले जनआरोग्य आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी रुग्णालयातून म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.

- Advertisement -

म्युकरमायकोसिसचा उपचार देणारे रुग्णालय कोणत्या विभागात आहे, त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांची, शहरांची आणि भागांची विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार हे दर आकारले जातील. तसेच, कोणत्या सुविधा दिल्या जात आहेत, त्यानुसार प्रतिदिन कमाल किती दर आकारता येतील, हे सरकारने काढलेल्या आदेशांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. यानुसार…

वॉर्ड आणि आयसोलेशनची सुविधा – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ४ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ३ हजार रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी २ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयूशिवाय फक्त व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ७ हजार ५०० रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ५ हजार ५०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ४ हजार ५०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

आयसीयू, व्हेंटिलेटर आणि आयसोलेशन – अ श्रेणीतील शहरे, प्रभागांसाठी ९ हजार रुपये प्रतिदिन, ब श्रेणीसाठी ६ हजार ७०० रुपये प्रतिदिन तर क श्रेणीसाठी ५ हजार ४०० रुपये प्रतिदिन आकारता येतील.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.