नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख
तापमान वाढल्याने अंगाची लाहीलाही होत असताना अनेक जण थंडपेय, माठातील पाणी अशा उपायांचा अवलंब करतात. मात्र नाशिकमधील काहीजणांनी चांभारलेणी येथे आज चिखल स्नान म्हणजे मडबाथ घेण्याची शक्कल लढविली आहे. त्यांनी संगीताच्या तालावर भरउन्हात नृत्य करत चिखल स्नान घेण्याचा आनंद लुटला.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमान ४० अंशाहून अधिक झाले आहे. या वाढत्या तापमानापासून बचाव करण्यासाठी नाशिकच्या चिराग शहा यांनी चिखल स्नानाची संकल्पना राबविली. त्यासाठी नाशिकच्या चांभारलेणी डोंगराच्या पायथ्याशी चिखल स्नानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चिखल स्नान घेणाऱ्या नागरिकाने सांगितले, की मातीमुळे शरिरातील ऊष्णता कमी होते. तसेच त्वचारोग शरिरारापासून दूर राहतात. येथे गेल्या तीस वर्षांपासून चिखल स्नानाचे आयोजन करण्यात येते.
चिखल स्नानामध्ये नाशिकमधील राजकीय नेते, कार्यकर्ते, व्यापारी, लहान मुले तसेच इतर जण सहभागी झाल्याचे दिसून आले. चिखल स्नानाचा हा कार्यक्रम आणखी मोठ्या प्रमाणावर भरावा, अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे.