डोक्यात लाकडी दांडा टाकून रसवंती चालकाची निर्घृणपणे हत्या

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका राजस्थानी रसवंती चालकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव या ठिकाणी काल मध्यरात्री हि हत्या करण्यात आली. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत व्यक्ती राजस्थानमधील
काल नांदेडमध्ये प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांची त्याच्या राहत्या घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हि घटना ताजी असताना आज हिंगोलीत एका राजस्थानी व्यावसायिकाचा एका अज्ञात व्यक्तीकडून निर्घृणपणे खून करण्यात आला. लादू लाल साहू असे खून झालेल्या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा राजस्थानमधील भिलवाडा या ठिकाणचा रहिवाशी होता.

श्वानपथकही तपासासाठी दाखल
मृत लादू लाल साहू मागील पाच ते सहा वर्षांपासून उन्हाळ्यात रसवंतीगृह व ज्युस सेंटर चालवतात. आज सकाळी रसवंती गृहाच्या पाठीमागील त्यांच्या निवासाच्या ठिकाणी लादू लाल यांचा मृतदेह आढळून आला. एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात लाकडी दांडा व लोखंडी सराट्याने वार करून त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्हा हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.