कराड प्रतिनिधी | रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादमतात्या यांच्या जयंतीनिमित्त दिले जाणारे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु नागनाथ कोतापल्ले यांच्या ‘अस्तित्वाची शुभ्र शिडे’ या ग्रंथास मुकादम साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष दानशुर बंडो गोपाळा कदम याच्या ११९ व्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण अंनिस चे हमीद दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुकादम साहित्य पुरस्कार नागनाथ कोतापल्ले यांच्या अस्तित्वाची शुभ्र शिडे या पुस्तकास तर प्रा. ए. डी. आत्तार आदर्श शिक्षक पुरस्कार विंग येथील आदर्श विद्यामंदीर शाळेच्या उपशिक्षिका सौ मनिषा पाटील यांना जाहीर झाला आहे. तसेच चैतन्य पुरस्कार काले येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या उपशिक्षिका सौ रंजना पाटील यांना जाहीर झाला आहे.
दरम्यान, मुकादम तात्यांनी स्थापन केलेल्या कुसुर येथील स.गा.म. विद्यालयाचे यंदा अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी संघटना, कुसूर यांच्याकडून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील जाहीर झालेल्या पुरस्कारांचे वितरण २९ जानेवरी रोजी स.गा.म. विद्यालयाच्या प्रागणातील आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.