हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना असे या योजनेचे नाव असून शेतीतील रस्ते वाहतुकीची समस्या मिटवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठीविधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा तसेच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं की… ही योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली आहे. सर्वसामान्य शेतकर्यांच्या आयुष्यात क्रांंती घडविणारी ही योजना आहे. शेतकर्याच्या शेतापर्यंत रस्ते,वीज आणि पाणी पोहोचले तर त्याला आपला माल बाजारपेठेत घेऊन जाणे शक्य होणार आहे. यासाठी सरकारने प्राधान्याने या योजनेवर भर दिला असून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे म्हणाले की, सर्व आमदारांनी याबाबत अतिदक्ष राहून सर्व पाणंद रस्ते नकाशावर आणावेत. हा नकाशा पुढील महिनाभरात गावामध्ये प्रसिद्ध करण्यात यावा. विविध 13 योजनांच्या माध्यमातून सध्या या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या योजनेसाठी मनरेगा आणि इतर १३ विविध योजनांतून निधी उपलब्ध केला जाईल. सीएसआर (CSR) निधीचा उपयोग करण्यासाठी प्रांताधिकारी यांचे विशेष खाते तयार केले जाईल.एक किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रस्त्यांना व्हीआर नंबर देण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल.




