हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Bangalore Train । महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मागील ३० वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मुंबई ते बेंगलोर या एक्सप्रेस ट्रेनला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. मुंबई आणि बेंगलोर हि दोन्ही शहरे देशातील टॉपची शहरे म्हणून ओळखली जातात. त्यामुळे हि दोन्ही शहरे रेल्वेने थेट जोडली जावीत आणि यादरम्यान असलेल्या इतर छोट्या शहरांना सुद्धा याचा फायदा व्हावा यासाठी मागील ३० वर्षांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर मुंबई ते बेंगलोर रेल्वेसेवेला केंद्राने हिरवा झेंडा दाखवला आहे.
रेल्वे मंत्रालयाने मुंबई – बेंगलोर दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन (Mumbai Bangalore Train) सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे मात्र ही गाडी प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरू होईल या संदर्भात अजून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या एक्सप्रेस ट्रेनसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची गरज त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितली.
कधी सुरू होणार? Mumbai Bangalore Train
सध्या उद्यान एक्सप्रेस ही बेंगळुरू आणि मुंबईला जोडणारी एकमेव थेट ट्रेन होती. सुमारे १,१३६ किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल २३ तास आणि ३५ मिनिटे लागतात. हा मार्ग दोड्डाबल्लापूर, गुंटकल, रायचूर, यादगीर, कलबुर्गी आणि सोलापूरमधून जातो, या प्रवासादरम्यान ३२ थांबे आणि परतीच्या प्रवासात ३१ थांबे असतात. आता मात्र हुबळी मार्गे धावणारी ही नवीन सुपरफास्ट ट्रेन जलद आणि अधिक कार्यक्षम असेल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. अहवालांनुसार, ही सेवा प्रवाशांसाठी, विशेषतः व्यवसाय किंवा पर्यटनासाठी प्रवास करणाऱ्यांसाठी, वाढीव आराम, चांगली कनेक्टिव्हिटी आणि अनुभव देईल. ही नवीन एक्सप्रेस ट्रेन नेमकी कधी सुरू होणार, याचे वेळापत्रक कसे राहणार याची अधिकृत तारीख अजूनही समोर आलेली नाही. परंतु रेल्वे मंत्रालय याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही माध्यमांनी तर मुंबई – बेंगलोर एक्सप्रेस डिसेंबर पासून सुरू होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.




