मुंबई – जवाहरलाल नेहरू बंदरावर (जेएनपीए) ये-जा करणाऱ्या अवजड वाहनांमुळे कळंबोलीतील वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आणि जेएनपीएला जोडणाऱ्या रस्त्यांवर सतत होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी अखेर हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी तब्बल ७५५ कोटी रुपये खर्चून डबलडेकर इंटरचेंज उभारण्यात येणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या प्रकल्पाची तयारी सुरू केली आहे.
कळंबोली जंक्शनवर शीव-पनवेल रस्ता मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला मिळतो. याच ठिकाणी शीळफाटा-कल्याण रस्ता जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग ४८ ला जोडला जातो. पनवेलमार्गे गोव्याला जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८ आणि जेएनपीए पोर्टची वाहतूक देखील याच जंक्शनवरून होते. यामुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी होते.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एनएचएआयने डबलडेकर इंटरचेंजचे नियोजन केले आहे. यामध्ये जमिनीवरील वाहतूक, पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावर उड्डाणपूल असतील. शीळफाटा-कल्याणकडून नवी मुंबईकडे जाण्यासाठी भूमिगत रस्ता तयार करण्यात येईल. याच रस्त्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही जाता येईल. मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक पहिल्या मजल्यावरून वळवण्यात येईल. याच मजल्यावर जेएनपीएकडे जाणारा मार्ग असेल. मुंबई-पुणे जुना महामार्ग किंवा द्रुतगती मार्गाकडे जायचे असल्यास पहिल्या मजल्याचा वापर करावा लागेल. शीळफाटा-कल्याण ते गोवा, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जेएनपीएसाठी दुसऱ्या मजल्यावरून रस्ता असेल.
या प्रकल्पासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जेएनपीए किंवा गोवा महामार्गाकडे जाण्यासाठी जंक्शनच्या वायव्य दिशेकडील ८८८७.४० चौरस मीटर जमीन संपादित करावी लागणार आहे. ही जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली असून प्राथमिक कामे सुरू झाली आहेत, अशी माहिती एनएचएआयचे मुंबई प्रादेशिक महाव्यवस्थापक अंशुमाली श्रीवास्तव यांनी दिली.
प्रकल्पाची माहिती:
- एकूण लांबी: १५.५३२ किमी
- अपेक्षित वाहतूक (२०४६ पर्यंत): ५.८२ लाख वाहने
- भूमिगत रस्त्याची लांबी: ८७१ मीटर
- बांधकाम खर्च: ६९७.२२ कोटी रुपये (इतर खर्च १३१.३० कोटी रुपये)
- एकूण खर्च: ७५५.७१ कोटी रुपये