मुंबईत सप्टेंबर महिन्यातील पावसाचा २६ वर्षांतला विक्रम मोडीत; येत्या २४ तासात मुसळधार सरींची शक्यता

मुंबई । मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू मुसळधार पाऊस सुरु आहे. मंगळवार रात्रीपासून मुंबईत २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये रात्रभर पडलेल्या पावसाने २६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. १९९४ ते २०२० या कालावधीमध्ये सप्टेंबर महिन्यात यापूर्वी एका दिवसात मुंबईत एवढा पाऊस कधीच पडला नव्हता. तसेच १९७४ पासून सप्टेंबर महिन्यात २४ तासामध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची ही चौथी वेळ आहे. मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला. मंगळवारी सकाळी साडे ८ ते बुधवारी सकाळी साडे ८ दरम्यान मुंबईमध्ये २८६.४ मिमी पावसाची नोंद झाली.

याच कालावधीमध्ये दक्षिण मुंबईत म्हणजेच कुलाब्यात १४७.८ मिमी पाऊस पडला. मंगळवारी संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडे अकरा या सहा तासांच्या कालावधीमध्ये मुंबईत १०७ मिमी पावसाची नोंद झाली. तर रात्री साडे अकरा ते पहाटे साडे ५ या ६ तासांमध्ये दक्षिण मुंबईत ८९ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय हवामान खात्यानुसार १५.६ मिमी ते ६४.४ मिमी पाऊस हा मध्यम स्वरुपाचा, ६४.५ मिमी ते ११५.५ मिमी पाऊस मुसळधार तर ११५.६ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस हा अती मुसळधार म्हणून गणला जातो. त्याचप्रमाणे २०४ मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद अतीवृष्टी म्हणून केली जाते.

आजही मुसळधार पावसाचा इशारा
आजही (बुधवार, २३ सप्टेंबर २०२०) मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याच्या मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी दिली. त्यांनी ट्विटद्वारे याविषयी माहिती दिली आहे. दरम्यान, सकाळी ५.३० वाजेपर्यंत कुलाबा येथे १२२.२ मिलीमीटर तर सांताक्रुझ येथे २७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

मुंबईत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रेल्वेसेवरही त्याचा परिणाम झाला आहे. चर्चगेट ते अंधेरी दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं या स्थानकांदरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या अंधेरी ते विरार दरम्यान लोकल सेवा सुरू आहेत. तर दुसरीकडे मध्य रेल्वे मार्गावरही रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशीदरम्यान रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा सुरू आहेत. आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

You might also like