हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्नी नताशा सोबत घटस्फोट आणि भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदावरून हटवल्यानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) तिसरा धक्का बसणायची शक्यता आहे. कारण आयपीएल मधील त्याचा संघ मुंबई इंडियस (Mumbai Indians) सुद्धा २०२५ च्या आयपीएल मधून हार्दिकचे कर्णधारपद काढेल अशा चर्चा सुरु आहेत. २०२४ च्या आयपीएल मध्ये मुंबईला हार्दिकला गुजरात मधून रिटेन केलं आणि रोहित शर्माच्या जागी कर्णधार सुद्धा केलं मात्र मुंबई इंडियसच्या सुमार कामगिरीमुळे हार्दिक टीकाकारांचा धनी बनला होता. पुढील सत्राआधी आयपीएलचा लिलाव होणार असल्याने मुंबई नेमकी काय भूमिका घेते ते पाहायला हवं.
पुढील आयपीएलसाठी मेगा लिलाव होणार आहे. बीसीसीआयने अद्याप स्पष्ट केलेले नाही की फ्रँचायझी किती खेळाडूंना कायम ठेवू शकते. मुंबईचा सूर्यकुमार यादव भारतीय टी-२० संघाचा कर्णधार झाल्याने त्याला मुंबईचा संघ कायम ठेवेल हे नक्की आहे.. रोहित शर्माचा फॉर्म आणि देशभरात त्याची वाढलेली लोकप्रियता पाहता मुंबईचा संघ रोहितला सोडेल अशी अजिबात शक्यता नाही आणि जसप्रीत बुमराह सारख्या मॅचविनर गोलंदाजाला सोडण्याची महाचूक मुंबई सारखी मुरब्बी फ्रॅन्चायजी करणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. जर ४ खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी मिळाली तर मुंबई हार्दिकला सुद्धा संघात कायम ठेवेल मात्र तो मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी कायम राहणार की त्याचं कर्णधारपद हिसकावून घेणार, हे आगामी काही दिवसात स्पष्ट होईल.
दरम्यान, T20 वर्ल्ड कप-2024 नंतर रोहित शर्माने T20 मधून क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर उपकर्णधार असलेला हार्दिक पंड्याच भारताचा पुढचा कप्तान होईल असं बोललं जात होते. मात्र गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर उलटच घडलं. हार्दिकला कर्णधार तर केलं नाहीच याउलट त्याच्याकडील उपकर्णधार पद सुद्धा काढून घेण्यात आलं. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनीही पांड्याला कर्णधारपदासाठी योग्य मानले नाही. याचे कारण त्याचा फिटनेस होता. हार्दिकचा खराब फिटनेस आणि सततच्या दुखापतीमुळे त्याच्याकडील उपकर्णधार काढून घेण्यात आलं असल्याचे बोलले जातंय. आता जर मुंबई इंडियन्सने सुद्धा त्याच्याकडील कर्णधारपद काढलं तर मग हार्दिक पंड्यासाठी हा तिसरा मोठा धक्का असेल.