गुड न्यूज! 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल ठराविक वेळेत सुरु; मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना महामारीच्या काळात खबरदारी घेत मुंबईतील लोकल सेवा (Mumbai Local) अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र, 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. आता लोकल ट्रेन 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा आखून दिलेल्या ठराविक वेळात सर्वसामान्य प्रवाशांसाठी धावणार आहे. सर्व प्रवाशांना पहाटेच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे.

याव्यतिरिक्त सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील. लोकल सेवा सुरु करताना मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. त्याप्रमाणे आता विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु होणार आहे. या बाबतीतली सुचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Leave a Comment