Mumbai Metro : आरे ते वरळी अवघ्या 30 मिनिटांत ; मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार

0
30
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai Metro : मुंबईतील वाहतुकीत क्रांतिकारी बदल घडवणारी मेट्रो लाईन 3 लवकरच संपूर्णपणे सुरू होणार आहे. ही मुंबईची पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो लाईन असून, मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाचा चेहरामोहरा बदलणारी ठरणार आहे. आधी ऑक्टोबर 2024 मध्ये आरे ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) हा टप्पा सुरू करण्यात आला होता. आता हा मार्ग वरळी (Mumbai Metro) नाका (आचार्य अत्रे चौक) पर्यंत वाढवण्यात येत आहे.

गर्दीमुक्त प्रवासाची सोय (Mumbai Metro)

ही वातानुकूलित (AC) मेट्रो लेडी जमशेदजी रोड आणि डॉ. एनी बेसंट रोड यांसारख्या नेहमीच गजबजलेल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्याचा पर्याय ठरेल. प्रवाशांना आता ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागणार नाही. याचा थेट फायदा धारावी, दादर, सिद्धिविनायक आणि वरळी परिसरातील रहिवाशांना होणार आहे. या मेट्रोचे भाडे फक्त 10 रुपयांपासून 60 रुपयांपर्यंत असणार आहे, त्यामुळे प्रवाशांच्या खिशालाही परवडणारी आहे.

कफ परेडपर्यंत ट्रायल यशस्वी (Mumbai Metro)

गेल्या शुक्रवारी कफ परेड स्थानकापर्यंत ट्रायल ट्रेनने यशस्वी धाव घेतली. 33.5 किलोमीटर लांबीच्या या अक्वा लाईन (मेट्रो-3) चा कफ परेड शेवटचा टप्पा आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) जुलै 2025 पर्यंत संपूर्ण मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.

मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो

मेट्रो लाईन 3 ही मुंबईची पहिली पूर्णपणे अंडरग्राउंड मेट्रो सेवा आहे. पश्चिम उपनगरांतील आरे पासून ते दक्षिण मुंबईतील कफ परेड पर्यंत ही मेट्रो धावणार आहे. तीन टप्प्यांत या मार्गाची उभारणी केली जात आहे.

दुसऱ्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात (Mumbai Metro)

पहिला टप्पा – आरे ते BKC (12.69 किमी) हा भाग 7 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू झाला. यामुळे पश्चिम उपनगर आणि BKCमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला. यशस्वी पहिल्या टप्प्यानंतर MMRC दुसऱ्या टप्प्यावर वेगाने काम करत आहे.

दुसरा टप्पा दोन भागांत

टप्पा 2A: धारावी ते आचार्य अत्रे चौक (9.77 किमी) – 7 मुख्य स्टेशनसह येथे सध्या सिस्टम ट्रायल सुरू आहेत.
टप्पा 2B: आचार्य अत्रे चौक ते कफ परेड (10.99 किमी) – या भागात अलीकडेच यशस्वी ट्रायल रन पार पडला.

महत्त्वाची कामे पूर्ण, शेवटची जोडणी सुरू

या मार्गावरील ओव्हरहेड केटेनरी सिस्टम (OCS) बसवणे, रेल्वे ट्रॅक टाकणे यासारखी महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. आता MMRC अंतिम तांत्रिक चाचण्या, स्टेशनचे अंतिम फिनिशिंग आणि रस्त्यांचे काम पूर्ण करण्यावर भर देत आहे. MMRCच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी हा ट्रायल रन मोठे यश असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, जुलै 2025 पर्यंत संपूर्ण मेट्रो लाईन सुरू करण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा पार केला आहे.

मुंबईकरांसाठी वरदान (Mumbai Metro)

ही मेट्रो लाईन म्हणजे मुंबईकरांसाठी आशीर्वादच आहे. सततची वाहतूक कोंडी, वाढता प्रवासाचा वेळ आणि प्रदूषण यावर ही मेट्रो प्रभावी उपाय ठरणार आहे. वेळ, पैसे आणि ऊर्जा वाचवणाऱ्या या प्रकल्पासाठी MMRCने सातत्याने मेहनत घेतली आहे. अनेक आव्हानांवर मात करत ही सेवा मुंबईकरांच्या दारात आणण्याचा त्यांचा संकल्प आहे. तर, मुंबई मेट्रो लाईन 3 ही भविष्यातील प्रवासाचे नवे दार उघडणार असून, 2025 मध्ये मुंबईकरांना अत्याधुनिक, जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर अशी भूमिगत मेट्रो सेवा मिळणार आहे.